स्त्रीशक्ती सांभाळणार संपूर्ण मतदान केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:06 AM2019-04-16T00:06:49+5:302019-04-16T00:07:10+5:30
निवडणूक आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान केंद्र.
अलिबाग : निवडणूक आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदान केंद्र. येथे काम करणे अत्यंत जबाबदारीचे आणि तितकेच जोखमीचे काम. मतदानावरून राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या कारणावरून वादाचे मुद्दे उद्भवतील आणि परिस्थिती गंभीर बनेल, हे कोणीही सांगू शकत नाही. परंतु ही मतदान केंद्रावरील जबाबदारी सांभाळण्यात आम्ही देखील सक्षम आणि समर्थ आहोत हे यंदाच्या रायगड लोकसभा मतदार संघातील सात ‘सखी मतदान केंद्रावर’ महिला अधिकारी व कर्मचारी सिद्ध करून दाखविणार आहेत.
रायगड लोकसभा मतदार संघातील या सात सखी मतदान केंद्राच्या मतदान केंद्राध्यक्षा, सर्व संबंधित कर्मचारी आणि बंदोबस्ताकरिता असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील महिलाच राहाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा उप निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
सात सखी मतदान केंद्रांपैकी, अलिबाग विधानसभा मतदार संघात दोन आहेत. त्यामध्ये सखी मतदान केंद्र क्र.१५०आणि सखी मतदान केंद्र क्र.१५१ ही सरखेल कान्होजी आंग्रे निवासी वसाहत आरसीएफ स्कूल, कुरुळ-अलिबाग येथे राहाणार आहेत. पेण विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र क्र.१२६ हे पेण शहरातील सार्वजनिक विद्यामंदिर शाळेतील खोली क्र.६ मध्ये राहाणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र क्र.१६७ हे उतेखोलमधील रायगड जि.प.मराठी शाळा, विकास कॉलनी येथे राहाणार आहे. महाड विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र क्र.२८८ हे कांबळे तर्फे महाड गावांतील रायगड जि .प. शाळेतील खोली क्र.२ मध्ये राहाणार असल्याचे माने यांनी सांगितले.
रायगड लोकसभा मतदार संघात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. दापोली विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र क्र.२११ हे गिम्हवणे गावातील रतानगिरी जिल्हा परिषद शाळेत तर गुहागर विधानसभा मतदार संघात सखी मतदान केंद्र क्र.८७ हे गुहागर शहरातील गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर शाळेमध्ये राहाणार असल्याचे माने यांनी सांगितले.
महिला मतदारांचा गौरव
रायगड लोकसभा मतदार संघातील पेण विधानसभा मतदार संघ वगळता उर्वरित अलिबाग, श्रीवर्धन, महाड,दापोली आणि गुहागर या पाच विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार यंदा साकारणाऱ्या ‘सखी मतदान केंद्र’ संकल्पनेतून महिला मतदारांचा अनाहूतपणे आगळा गौरव होणार आहे.
महिला मतदारांना आपला मतदानाचा पवित्र हक्क, निर्भयपणे आणि कोणत्याही दडपणाशिवाय बजावता यावा याकरिता ही ‘सखी मतदान केंद्र’ संकल्पना निवडणूक आयोगाने अमलात आणली आहे. ‘सखी मतदान केंद्र’ असे स्पष्ट आणि ठळकपणे या सात मतदान केंद्रांवर नमूद केलेले असेल.
- वैशाली माने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी