“सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे अन् यशोमती ठाकूर हरवल्या आहेत, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ”
By प्रविण मरगळे | Published: January 19, 2021 10:07 AM2021-01-19T10:07:49+5:302021-01-19T10:10:49+5:30
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी भाजपाच्या महिला आघाडीने ठिकठिकाणी आंदोलन केले
मुंबई – बलात्काराचा आरोप झाल्यामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेचे भडीमार सुरूच आहे. रेणु शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बॉलिवूडमध्ये संधी देतो या बहाण्याने धनंजय मुंडेंनी माझा वापर केला असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी सध्या पोलीस तपास सुरू आहे, मात्र धनंजय मुंडे प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी भाजपाच्या महिला आघाडीने ठिकठिकाणी आंदोलन केले, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा सावध पवित्रा घेतला. तक्रारदार महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप झाले आहेत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितले. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे आरोप झालेले असताना राज्यातील महिला नेत्या गेल्या कुठे असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.
याबाबत तृप्ती देसाई म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्यावर रेणु शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र या विषयावर महाराष्ट्रातल्या महिला नेत्या जाहीर बोलायला तयार नाही, ज्या महिला नेत्या एखाद्या पीडितेवर अत्याचार झाला, तक्रार आली तर तातडीने पत्र व्यवहार करतात, ट्विट करतात, पीडितेची भेट घेतात, मग आता या महिला नेत्या गेल्या कुठे? मग त्यात शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे असतील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे असो वा काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर असतील, या नेत्या सध्या महाराष्ट्रात नाहीत का? त्या सगळ्या हरवल्या आहेत का? आणि खरोखरच त्या बोलत नसतील तर त्यांचा शोध घ्यावा लागेल, या नेत्यांचा शोध घेणाऱ्यास भूमाता ब्रिगेडकडून ५०० रुपये बक्षिस देऊ असं त्यांनी जाहीर केले.
त्याचसोबत खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाच्या नेत्याविरोधात कोणती महिला तक्रार करत असतील, तर या नेत्या शांत बसणार असतील, तर आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा अशी स्थिती आहे, असा न्याय महिला नेत्या देत असतील तर महिला सबळीकरण यापुढे महाराष्ट्रात अशक्य आहे, शक्ती कायदा आपण करता मग हा कायदा सर्वांसाठी समान आहे, मग गरीब, श्रीमंत, नेता, सर्व सामान्य असा फरक का होतोय? याचं उत्तर या महिला नेत्यांनी द्यावं. रेणु शर्मा यांच्यासोबत आम्ही आहोत, पण रेणु शर्मा यांच्यावरही आरोप केले आहेत त्या चुकीच्या असल्या तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन
दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र मला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्यांचे फोन येत असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे, याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे ते सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. त्यात महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांचा समावेश आहे. तसेच रविवारी सकाळी ११.३० वाजता दोनदा धमकीचे फोन आले, सर्व ६ बुलेट्स तुझ्या डोक्यात घालणार, गेल्या २ दिवसांपासून धमकीचे फोन सुरूच आहे. याबाबत सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना सोमय्यांनी पत्र पाठवून तक्रार नोंदवली आहे.