उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 12:53 PM2021-02-17T12:53:49+5:302021-02-17T13:00:51+5:30
BJP MP Udayanraje Bhosale met Chief Minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान, आज भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. (Maharashtra Politics) मात्र उदयनराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचा तपशील समोर येऊ शकलेला नाही. (Udayanraje Bhosale met Chief Minister Uddhav Thackeray)
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीबाबतचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजेंनी शरद पवार तसेच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने त्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
साताऱ्याचे माजी खासदार आणि सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार असलेले उदयनराजे भोसले आपल्या दिलदार स्वभावामुळे सर्वपरिचीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून काँग्रेस आघाडीच्या नेत्यांसोबतच त्यांचा वावर कमी झालाय. पण, मित्र बनून ते अनेकांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत.