Uddhav Thackeray Birthday: बाळासाहेबांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी विराजमान करणारा 'उद्धव पॅटर्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:06 AM2021-07-27T08:06:33+5:302021-07-27T08:07:09+5:30
उद्धव ठाकरे यांच्यावर मीडियाने नेहमीच अन्याय केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्याशी तुलना करण्याचा मोह जसा भाजपच्या नेत्यांना, विरोधकांना आवरला नाही तसाच तो मीडियातील धुरिणांनाही आवरला नाही.
संदीप प्रधान
राजकारणात यशासारखे दुसरे काहीच असत नाही. युद्धात आणि राजकारणात यश हे सत्य असते मग ते मिळवण्याकरिता चोखाळलेले मार्ग हे केवळ साधन असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ५५ वर्षांची असून तिची सूत्रे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यात आणि त्यांच्या पिताश्रींमध्ये साम्यस्थळांपेक्षा भिन्नस्थळे अधिक आहेत. बाळासाहेब आक्रमक होते तर उद्धव नेमस्त आहेत. बाळासाहेब रोखठोक होते तर उद्धव भीडस्त आहेत. बाळासाहेब फर्डे वक्ते होते तर उद्धव आक्रमक आहेत. उद्धव यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याकरिता प्रभावी हालचाली करुन एकप्रकारे आपणही बाप से बेटा सवाई आहोत, असे दाखवून देणारा उद्धव पॅटर्न राजकारणात रुढ केला आहे. हौशी छायाचित्रकार अशी ओळख असलेल्या उद्धव यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षात राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला असून शिवसेनेला पुन्हा सत्तासिंहासनावर बसविले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर मीडियाने नेहमीच अन्याय केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्याशी तुलना करण्याचा मोह जसा भाजपच्या नेत्यांना, विरोधकांना आवरला नाही तसाच तो मीडियातील धुरिणांनाही आवरला नाही. बाळासाहेबांचे वक्तृत्व, त्यांचा हजरजबाबीपणा, त्याचे ‘एक घाव, दोन तुकडे’ करणारी निर्णयक्षमता अशा अनेक बाबींशी उद्धव यांची तुलना केली गेली. बाळासाहेबांनी उद्धव यांना आपला वारस नियुक्त केल्यावर राज ठाकरे यांच्याशी त्यांची तुलना केली जाऊ लागली. राज हे तर बाळासाहेबांची डिट्टो झेरॉक्स कॉपीच असल्याने पुन्हा वक्तृत्वापासून अनेक बाबतीत उद्धव यांना उणेपणाचे शिकार केले गेले. बाळासाहेब किंवा राज हे स्पष्टवक्ते तर उद्धव हे पक्के भिडस्त. त्यांनी ही सल मनात एखाद्या जाळीदार पिंपळपानासारखी जपली. बाळासाहेबांनी त्यांच्या हयातीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवला. त्यांचा वारस म्हणून आपण यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब करवून घ्यायचे असेल तर शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर बसवण्याखेरीज पर्याय नाही हे हेरुन उद्धव यांनी पुढील व्यूहरचना केली. अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्याने ती सुफळ संपूर्ण झाली.
उद्धव यांच्या अगोदर शिवसेनेत राज ठाकरे हे सक्रिय झाले. राज हे भारतीय विद्यार्थी सेनेचे नेते होते. महाविद्यालयातील निवडणुका, विद्यापीठातील राजकारण आणि राजकीय व्यंगचित्रकारिता या माध्यमातून त्यांनी आपला राजकारणातील ठसा उमटवला. व्यंगचित्रकार असल्याने लोकसत्तेचे संपादक माधव गडकरी यांच्यापासून अनेक संपादकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यावेळी छायाचित्रकार असलेले उद्धव हे फारसे कुणाच्या परिचयाचे नव्हते. शिवसेनेच्या वाढीकरिता ‘सामना’ दैनिक सुरु केले तेव्हा त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुभाष देसाई यांच्यासोबत उद्धव पाहू लागले. मात्र राजकारणातील त्यांचा वावर फारच कमी होता. राज्यात युतीचे सरकार असताना राज यांनी लक्षावधी युवकांना रोजगार देण्याकरिता आयोजित केलेली मायकल जॅक्सनची कॉन्सर्ट असो की लता मंगेशकर रजनी त्यावेळी उद्धव हे स्पॉटलाईटपासून दूर होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी उद्धव यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यावेळी शिवसेनेतील निर्णय प्रक्रियेवर राज ठाकरे, स्मिता ठाकरे व त्यांच्याशी उत्तम संबंध असलेल्या नारायण राणे यांचा वरचष्मा वाढू लागला होता. मनोहर जोशी यांना पदावरुन दूर करण्यात आले त्याच्या मागेपुढे (बहुदा जोशी यांच्या सल्ल्यावरुन) उद्धव हे मातोश्री बंगल्यावर वास्तव्याला आले. उद्धव यांनी त्यावेळी उचललेले ते पाऊल हे पुढे त्यांना बाळासाहेबांचा राजकीय वारस ठरवणारे तर ठरलेच पण मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन जाणारे ठरले.
राज ठाकरे हे किणी प्रकरणात अडकल्यावर आपसूकच त्यांचे महत्त्व कमी होत गेले. उद्धव यांनी हीच संधी साधत शिवसेनेच्या संघटनात्मक बाबींमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. स्मिता ठाकरे यांचेही मातोश्रीवरील महत्त्व कमी झाले. १९९९ मध्ये शिवसेनेचा विरोध डावलून विधानसभेच्या निवडणुका घेण्यास भाजपने भाग पाडले. निवडणुकांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्याने भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले नाही. भाजपची उद्धव यांच्याशी झालेली पहिली ‘ओळख’ ही अशी असहकार्याची आहे. त्यामुळे आतापर्यंत भाजपशी त्यांनी केलेला असहकाराची बिजे ही त्यावेळी भाजप नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेत, असू शकतात.
महाबळेश्वर येथील शिवसेनेच्या शिबीरात उद्धव यांची शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा ठराव राज यांच्याकडून बाळासाहेबांनी मांडून घेतला. (पक्ष सोडला तेव्हा राज यांनी तो ठराव मांडून आपण पायावर धोंडा पाडून घेतला, असे म्हटले होते) शिवसेनेची संघटनात्मक सूत्रे हाती आल्यावर उद्धव यांनी चिकाटीने शिवसेना भवनात बसून संघटनेच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या पदांवर ते आपल्या विश्वासातील मंडळी नियुक्त करु लागले. सुभाष देसाई, अनिल देसाई, नीलम गोऱ्हे अशी नेमस्त मंडळी हळूहळू शिवसेनेतील अग्रणी होऊन दगडू सकपाळ, नारायण राणे, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर वगैरे मनगटशाहीवर विश्वास असणारी आक्रमक मंडळी अडगळीत पडू लागली. किणी प्रकरणाच्या तडाख्यातून हळूहळू सावरलेले राज यांच्याकडे नाशिक, पुणे या शहरांची जबाबदारी होती. तेथील पदाधिकाऱ्यांच्या बैठका उद्धव घेऊ लागल्याने राज यांची नाराजी वाढली. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या नारायण राणे यांनी मातोश्री क्लबला आमदार नेऊन ठेवून सरकार पाडण्याची केलेली खेळी उद्धव यांनी हाणून पाडत राणे यांचे महत्त्व कमी केले. राणे यांनी बंड केल्याने उद्धव यांचे सेनेतील एक प्रतिस्पर्धी बाहेर पडले. मुंबईतील वाढता मराठी टक्का लक्षात घेऊन उद्धव यांनी ‘मी मुंबईकर’ अभियान सुरु केले व सेनेची कठोर मराठी हिताची भूमिका सौम्य केली. त्याला विरोध करण्याचा प्रयत्न राज यांनी केला. मात्र पाठोपाठ राज यांनीही मनसेची स्थापना केल्याने सुंठीवाचून उद्धव यांचा खोकला गेला.
शिवसेना कमकुवत झाल्याचे भाजप नेते सांगू लागले. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना टिकणार नाही, अशी भाषा भाजपचे नेते खासगीत बोलू लागले. मीडियातही त्याचीच री ओढली गेली. उद्धव हे फारसे कुणाच्या संपर्कात नसत. फोन घेत नसत. पण आपल्यावर हेतूत: अन्याय केला जात असल्याची त्यांच्या मनात भावना होती. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर चिमूरच्या पोटनिवडणुकीत जागा सोडण्यावरुन उद्धव आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यात जोरदार खडाखडी झाली. बाळासाहेबांचे लाडके गडकरी त्या काळात मातोश्रीचे दोडके झाले. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांचे फोन अनेकदा मातोश्रीवर घेतले गेले नाही. २००९ च्या निवडणुकीत राज यांच्या मनसेनी शिवसेनेला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे भाजपचे नेते मनातून आनंदीत झाले. यापुढे राज हेच बाळासाहेबांचा वारसा चालवणार, ही भावना पुन्हा प्रबळ झाली. नरेंद्र मोदी यांना राज यांना लाल पायघड्या घालून गुजरातमध्ये बोलावून घेतले. तेथील विकास कामांचे दर्शन घडवले. उद्धव व भाजप नेत्यांमधील दुरावा वाढत होता. बाळासाहेब थकले. ‘उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या’, अशी आर्जवाची भाषा जाहीर सभेत करताना लोकांनी बाळासाहेबांना पाहिले. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. मोदींचा करिष्मा, अमित शहांचे संघटन कौशल्य या जोडगोळीपुढे भलेभले राजकीय नेते धोबीपछाड झाले.
आता वेळ शिवसेनेची होती. बाळासाहेबांच्या पश्चात हे सहज शक्य असल्याची भाजप नेत्यांची पक्की खात्री होती. त्यातून २०१४ मध्ये भाजपपुढे झुकायचे नाही, असे ठरवून शिवसेनेनी १५१ चे मिशन आरंभले. युती तुटली तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना भाजप संपवू पहात असल्याचा प्रचार करुन उद्धव यांनी ६३ आमदार निवडून आणले. बाळासाहेब हयात नाहीत, राणे यांच्यासारखा रसद पुरवणारे नेता नाही, राज यांच्यासारखा स्टार प्रचारक नाही तरी आपल्या जेमतेम वक्तृत्वावर व नेमस्त सैनिकांच्या भरवशावर इतके यश मिळवू शकतो, यामुळे उद्धव यांचा आत्मविश्वास दुणावला. २०१९ मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचाच हे त्यांनी ठरवून टाकले आणि बसवला. ससा आणि कासवाची गोष्ट आपण साऱ्यांनीच लहानपणी ऐकली आहे. उद्धव हे त्या कथेतील शर्यत जिंकणारे कासव निघाले.
उद्धव बाळ ठाकरे
जन्मः २७ जुलै १९६०
कुटुंबातील सदस्यः पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य व तेजस ही मुले
छंदः फोटोग्राफी
त्यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांचे हवाई छायाचित्रण करून त्या छायाचित्रांचे महाराष्ट्र देशा हे पुस्तक २०१० साली प्रकाशित केले. पंढरपूर वारीबद्दलचे पाहावा विठ्ठल हे त्यांचे दुसरे पुस्तक २०११ मध्ये प्रकाशित झाले