उद्धव ठाकरेच फेल! किमान रिपोर्ट कार्ड ठेवायला हवे होते; भाजपाची पहिली प्रतिक्रिया
By हेमंत बावकर | Published: October 25, 2020 08:57 PM2020-10-25T20:57:40+5:302020-10-25T21:04:54+5:30
Keshav Upadhye slams Uddhav thackrey : उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण वेळ हा केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करण्यात गेला. शिवसैनिकांना सुद्धा त्यांच्या सरकारने काय केले हे सांगण्यासारखे ठोस काही नसावे, असा टोला भाजपाने लगावला आहे.
मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा मास्क बाजुला ठेवून केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपावर टीका केली. याऐवजी किमान शिवसैनिकांसमोर बोलताना त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी द्यायला हवी होती, अशी टीका भाजपाने केली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा संपूर्ण वेळ हा केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करण्यात गेला. शिवसैनिकांना सुद्धा त्यांच्या सरकारने काय केले हे सांगण्यासारखे ठोस काही नसावे. पुढच्या महिन्यात काम काय केले ते सांगणार असे सांगून भाषणाचा वेळ घालवला. आजच्या भाषणात काहीच नव्हते. औरंगजेब, वाघ, कोथळा, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही या भाषेपलीकडे काहीच नव्हते, अशी टीका उपाध्ये यांनी केली.
दसरा मेळाव्याततरी तरी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे किमान शिवसेनेसैनिकासमोर बोलताना तरी त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी देतील असे वाटले होते, मात्र त्यांच्या भाषणाचा सर्व वेळ हा केंद्र सरकार वर आणि भाजपा वर टीका करण्यात घालवला. —२
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 25, 2020
अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेलेच. पण ज्या स्वातंत्रवीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली त्याबद्दल त्यावेळी अवाक्षरही न काढणाऱ्या ठाकरेंना आज सावरकर स्मारकात यावे लागले हाच काळाचा न्याय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासलाय, शेतकऱ्यांची व्यथा भाषणात सांगितली. पण त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रूपये देऊन चेष्टाच केली आहे. जीएसटी संदर्भात केंद्राने दिलेला प्रस्ताव देशातील २० पेक्षा अधिक राज्यांनी स्वीकारला व ते पुढे गेले. मात्र, राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यात कोणताही रस नाही. कोरोना हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील कोणत्याही घटकास सरकारने दिलासा दिला नाही. अशा वेळी किमान आज शिवसैनिकांसमोर बोलताना तरी काही ठोस सांगतील, असे वाटत होते. कोरोना काळात मुख्यमंत्री कुठे बाहेर पडले नाहीत. देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. पीपीई किट घोटाळा झाला. महिलांवर अत्याचार वाढले त्याबद्दल उध्दव ठाकरे काही बोलले नाहीत, असे उपाध्ये म्हणाले.