२४ तासांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला तोडगा; जितेंद्र आव्हाड खुश अन् शिवसेना आमदारही समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 05:28 PM2021-06-23T17:28:03+5:302021-06-23T18:08:53+5:30
मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली.
मुंबई – कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना म्हाडाच्या १०० सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या १०० सदनिकांच्या चाव्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या होत्या. परंतु शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेत आव्हाडांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या स्थगितीमुळे जितेंद्र आव्हाड नाराज झाले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निर्णयाला स्थगिती दिल्याची खंत व्यक्त केली. परंतु मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज त्याच परिसरात जागा शोधून निर्णय घ्या असं सांगितलं अन् १५ मिनिटांत निर्णयही झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आल्या आहेत. मंत्री जितेंद आव्हाड यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही संवाद नसता तर २४ तासांत निर्णय झाला नसता. काल स्थगिती मिळाली आणि आज त्याच परिसरात तेवढ्याच जागा देऊ शकलो याचा आनंद आहे असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हाडा सदनिका कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. यावरून विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत या प्रकरणी तोडगा काढून जितेंद्र आव्हाडांना खुश तर आमदार अजय चौधरी यांचे समाधान केले.
आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?
शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
विरोधी पक्षांनी साधला होता निशाणा
कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी करत सरकारवर निशाणा साधला होता.