उद्धव ठाकरे चांगले चालक, पण जेव्हा ते कार चालवतात तेव्हा...; फडणवीसांचं प्रत्युत्तर
By मोरेश्वर येरम | Published: January 18, 2021 08:54 PM2021-01-18T20:54:39+5:302021-01-18T21:07:14+5:30
राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला. याच वेळी त्यांनी राज्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"मी सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय. मध्ये खड्डे आणि अडचणी येत असतात, पण त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही", असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यास राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जशासतसं प्रत्युत्तर दिलं आहे.
"उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण जेव्हा ते कार चालवत असतात तेव्हा त्यांच्यासाठी सर्व ट्राफिक थांबलेलं असतं", असं फडणवीस म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिशी बोलत होते. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर बोलत असताना फडणवीस यांनी राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला. याच वेळी त्यांनी राज्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती?; ठाकरेंनी एका सूचक विधानातून मारले अनेक पक्षी
"उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण जेव्हा ते कार चालवत असतात तेव्हा त्यांच्यासाठी सर्व ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. एका बाजूला ट्राफिक होणं सुरूच आहे. यावर जनता योग्य उत्तर आता देऊ लागली आहे", असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही
"राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.