कोरोना संकटकाळात ठाकरे सरकारनं दिला ५३ हजार तरुणांना रोजगार; मंत्र्यांची माहिती

By प्रविण मरगळे | Published: September 29, 2020 05:39 PM2020-09-29T17:39:14+5:302020-09-29T17:42:24+5:30

कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन मंत्री नवाब मलिकांनी केलं आहे.

Uddhav Thackeray government provides employment to 53,000 youths during Corona crisis | कोरोना संकटकाळात ठाकरे सरकारनं दिला ५३ हजार तरुणांना रोजगार; मंत्र्यांची माहिती

कोरोना संकटकाळात ठाकरे सरकारनं दिला ५३ हजार तरुणांना रोजगार; मंत्र्यांची माहिती

Next
ठळक मुद्देफक्त ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये १२८ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १३ हजार ८९४ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या.

मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ५३ हजार ०४१ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

फक्त ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला असं नवाब मलिकांनी सांगितले. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते असं त्यांनी सांगितले.

यात ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर ३७ हजार ३२० इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ६ हजार ७१०, नाशिक विभागात ५ हजार ६८७, पुणे विभागात १२ हजार ५२३, औरंगाबाद विभागात ७ हजार ०८८, अमरावती विभागात २ हजार ३४९ तर नागपूर विभागात २ हजार ९६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार १७७, नाशिक विभागात १ हजार ७६४, पुणे विभागात ६ हजार ३२०, औरंगाबाद विभागात २ हजार ९३२, अमरावती विभागात ११० तर नागपूर विभागात ४५१ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागल्याची माहिती सरकारने दिली   

ऑगस्टमध्ये १३ हजार जागांसाठी ऑनलाइन मुलाखती

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात ७६ ऑनलाइन रोजगार मेळावे झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये १२८ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १३ हजार ८९४ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १० हजार ३३२ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार २८९ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले.

नोकरी इच्छूक तरुणांना नोंदणी करण्याचं आवाहन

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन मंत्री नवाब मलिकांनी केलं आहे.

Web Title: Uddhav Thackeray government provides employment to 53,000 youths during Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.