"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:05 AM2024-09-30T10:05:59+5:302024-09-30T10:10:58+5:30
Ramdas Kadam Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत नवा राजकीय बॉम्ब फोडला. संजय शिरसाट यांनी केलेल्या खळबजनक दाव्यावर बोलताना त्यांनी हे विधान केले.
Ramdas Kadam Uddhav Thackeray News : टआनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झालो होता. हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे', असा खळबळजनक दावा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला होता. त्यावर बोलताना रामदास कदम यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद दिघेंचा अपघात होण्याच्या काही दिवस आधी ठाकरेंनी दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता, असा दावा रामदास कदमांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, "संजय शिरसाटांना काय माहिती आहे, याची मला कल्पना नाही. पण आनंद दिघे आणि मी, आम्ही जवळचे मित्र होतो. १९९५ मध्ये शिवसेनेचे सरकार आले होते. त्यावेळी आनंद दिघे हे ठाण्याच्या विकास कामांची यादी माझ्याकडे द्यायचे. मी ते मंजूर करून आणायचो. माझ्या हस्ते ते भूमिपूजन करायचे."
एकनाथ शिंदे चांगलं काम करताहेत -कदम
"मला वाटतं की याबाबतीत आता अधिक चर्चा करण्यापेक्षा, आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावेत याबाबतीत चित्रपटाच्या माध्यमातून जो कार्यक्रम एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. तो अतिशय स्तुत्य असा आहे. आनंद दिघेंबद्दल नव्या पिढीला कल्पना नव्हती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे करताहेत. चांगलं काम करताहेत", अशी भूमिका त्यांनी धर्मवीर चित्रपटाबद्दल बोलताना मांडली.
उद्धव ठाकरेंनी मागितला आनंद दिघेंचा होता राजीनामा -रामदास कदम
"त्यांचा खून कुणी केला, काय केला, कसा केला? त्यांचा मृत्यू कसा झाला, ही निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाहीये. ही वेळ नाहीये. मात्र, एवढं मला माहिती आहे की, आनंद दिघेंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता, हे मला माहिती आहे. त्याच काळामध्ये म्हणजे ज्यावेळी हा अपघात घडला, ते हॉस्पिटलमध्ये भरती होते; त्याच आठ दहा दिवसांच्या दरम्यान", असा स्फोटक दावा कदम यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केला.
याबद्दल पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले, "कारण स्वतः आनंद दिघे मला बोलले होते. माझी आणि आनंद दिघेंची याविषयावर चर्चा झाली होती. म्हणून एक गोष्ट नक्की आहे की, आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचे काम उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी होत होतं, हे शंभर टक्के सत्य आहे", असेही ते म्हणाले.
संजय शिरसाट आनंद दिघेंबद्दल काय म्हणालेले?
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट म्हणाले होते की, "आनंद दिघेंना मारले होते, त्यांचा अपघात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते, ते कायमचे बंद का करण्यात आले? दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता, मग डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला? आमच्या मनात अनेक वर्षांपासून शंका आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी", अशी मागणी शिरसाट यांनी केली होती.