"योगी येताच उद्धव ठाकरेंची झोप उडाली"; सामना अग्रलेखावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 10:49 AM2020-12-03T10:49:08+5:302020-12-03T10:50:36+5:30
Samana Editorial On Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी सामनाच्या संपादकीयवर टीका करताना निषेधही केला आहे.
मुंबई/लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले, असे म्हणत उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ आज सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले. यावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी टीका केली आहे.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी सामनाच्या संपादकीयवर टीका करताना निषेधही केला आहे. ''योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांनी सामना संपादकीयमधून चुकीची भाषा वापरली आहे. याचा आम्ही निषेध करतो. कदाचित ही त्यांच्या पक्षाची संस्कृती असेल. आम्ही खुल्या दिलाने बॉलिवूडच्या लोकांचे स्वागत करतो, असे सिंह म्हणाले आहेत.
Shiv Sena shouldn't raise fingers at others. They should 1st rectify their culture with Bollywood. If they want to keep something (Film City), they should keep it, no one wants to take it away. It's all about competition: UP Cabinet Minister S N Singh on Saamna Editorial https://t.co/yIgA9tKGrOpic.twitter.com/drLvnbJp3s
— ANI (@ANI) December 3, 2020
शिवसेना दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. त्याआधी त्यांनी बॉलिवूडसोबत असलेल्या परंपरेचा अभ्यास करावा. जर त्यांना काही ठेवायचे असेल तर त्यांनी ते जरूर ठेवावे. कोणालाही फिल्मसिटी काढून घ्यायची नाहीत. कारण हे सारे स्पर्धेतून होत आहे, असेही सिंह म्हणाले.
काय म्हणालेत सामनामध्ये?
येथील खरीखुरी मायानगरीही ते मिर्झापूरला हलवणार आहेत काय? उत्तर प्रदेशला सोन्यानेच मढवा व या सोन्याच्या विटा दिल्लीहून घेऊन या. आमची काहीच हरकत नाही, पण त्यासाठी मुंबईला बदनाम का करता? मुंबईला का ओरबाडता? मायानगरी तर दक्षिणेतील अनेक राज्यांतदेखील आहे. हैदराबादेत आहे. तामीळनाडू, आंध्रात आहे. योगी महाराज तेथेही जाऊन उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीचे कार्य पुढे नेणार आहेत काय? उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-1 व 2’ या वेब सीरिजमध्ये आहे. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे? की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे? एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱया ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, असेही म्हटले आहे.