मातोश्रीवरून आदेश निघाले; मुंबईत शिवसेनेचे मिशन 150 सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:22 PM2021-02-09T17:22:13+5:302021-02-09T17:24:19+5:30
BMC election, shivsena News: भाजपा आणि इतर पक्षात नाराज असलेल्यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदारांना मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते.
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अजून सुमारे एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना सर्व राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनेने सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष समीर देसाई, माजी आमदार कृष्णा हगडे यांच्या पाठोपाठ बोरिवलीचे माजी आमदार हेमेंद्र मेहता या भाजपावर नाराज असलेल्या तिघांनी शिवसेनेत नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने पश्चिम उपनगरात शिवसेनेचा गड मजबूत करण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. पश्चिम उपनगरात आता गुजराथी,दक्षिण भारतीय माजी आमदारांनी आणि आता चारकोप येथील शेकडो अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला असून सर्व जाती धर्माच्या नेत्यांचे शिवसेनेत सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे. (Shiv Sena preparing for BMC Election 2022)
भाजपा आणि इतर पक्षात नाराज असलेल्यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश शिवसेनेचे विभागप्रमुख व आमदारांना मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. एकीकडे मुंबईसह राज्यात कोरोना सुमारे 97 टक्के नियंत्रणात आणण्यात उद्धव ठाकरे यांचे कल्पक व नियोजनबद्ध नेतृत्व असून दुसरीकडे पक्षबांधणीकडे तितकेच त्यांचे बारीक लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचे 150 जागांचे लक्ष्य आहे. 1996 साली मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून आजमितीस पालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. आगामी पालिका निवडणूकीत शिवसेनेचा भगवा डोमाने फडकेल असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते, विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.
कांदिवली पश्चिम चारकोप येथे विभाग क्रमांक 2 च्या वतीने नुकताच शिवसेनेचा मेळावा विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांनी आयोजित केला होता.यावेळी शिवसेना नेते,राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व आमदार सुनील प्रभू यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शेकडो अल्पसंख्यांक बांधवांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांचे अल्पसंख्याक समाजावर असलेले प्रेम लक्षात घेता,समाजात मतभेद करणाऱ्या प्रवृत्तीला दूर ठेवण्याचे आवाहन सुभाष देसाई यांनी केले,तर आपल्या साक्षीने पालिकेवर भगवा फडकवण्याचे आवाहन आमदार प्रभू यांनी यावेळी केले.
यावेळी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे,महिला विभागसंघटक मनाली चौकीदार, माजी नगरसेवक दिलीप शिंदे,नगरसेविका शुभदा गुडेकर,गीता भंडारी,शंकर हुंडारे,तसेच मधुकर राऊत, मच्छिमार नेते किरण कोळी,अनिल भोपी,अँड.कमलेश यादव आणि इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.