"मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 01:28 PM2021-05-27T13:28:47+5:302021-05-27T13:31:35+5:30
Mahavikas Aghadi : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीववर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं निर्माण केलं जात असलेलं चित्र ही अफवा, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण. सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, राऊत यांनीही व्यक्त केला विश्वास.
"राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे," असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं आहे. "कुठल्याही मंत्र्यांनी कार्यपद्धतीवर कुठलेही प्रश्न निर्माण केलेले नाही. सरकार एकजुटीने काम करतेय," असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
"शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसह लसीकरण, लॉकडाऊन व इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. शिवाय पक्षाचे नेते शरद पवार यांना भेटले की, ते राजकीय परिस्थितीवर मंत्र्यासोबत चर्चा करत राहतात," असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
संजय राऊतांकडूनही स्पष्टीकरण
"अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा पसरवणं हा गुन्हा आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मराठा आरक्षणासह अनेक विषय आहेत. कोरोना, लसीकरण यावर चर्चा होऊ शकत नाही का? राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का? शरद पवारांचा सरकारला मनापासून आशीर्वाद आहे. हे सरकार ५ वर्ष पूर्ण करणार," असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.