‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:54 IST2021-07-27T16:52:20+5:302021-07-27T16:54:59+5:30
Devendra fadanvis Slam Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.

‘उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', देवेंद्र फडणवीसांचा टोला
मुंबई: आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या. 'उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) यांनी टोला मारला आहे.
'नेत्यांनी दौरे टाळायला हवे', शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, देशाच नेतृत्व करावं, असं म्हटलं होतं. त्यावर फडणवीस म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं, असं वाटत असेल तर चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. तसेच, मुख्यमंत्र्यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं राऊत म्हणाले होते. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.