उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 19:26 IST2024-09-18T19:16:09+5:302024-09-18T19:26:47+5:30
Sharad Pawar Maha Vikas Aghadi CM Face : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबद्दल बरीच चर्चा रंगली. उद्धव ठाकरे या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून म्हटले गेले. पण, याबद्दल शरद पवारांचे मत काय?

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
Sharad Pawar on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेआधी मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा समोर आला. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे ही चर्चा शरद पवारांनी संपवली. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले.
उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीकडे तुम्ही कसे पाहता आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील असे वाटते का? असा प्रश्न शरद पवारांना एका मुलाखतीत विचारण्यात आला.
शरद पवार म्हणाले, "असे आहे की, कोण मुख्यमंत्री होईल, हा विषयच आता आमच्या पुढे नाही. पण, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाचे संकट होते. संबंध देशात, देशाच्या बाहेर संकंट होते. केंद्र सरकारने अनेक गोष्टींवर बंधने घातली. देशाच्या पंतप्रधानांनी थाळी वाजवा सांगून लोकांना घराच्या बाहेर पडायचे नाही सूचना दिल्या होत्या."
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील कामाचे कौतुक
"कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे, बाकीचे मुद्दे सोडावे अशी भूमिका केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधानांनी स्वतः मांडली होती. त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, यासंबंधी पूर्ण सहकार्य करण्याचे काम पूर्ण ताकदीने केले. त्यांनी हे बघितले नाही की, नरेंद्र मोदींनी अशा अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यांचा पक्ष वेगळा आहे. इथे पक्ष वगैरे काही नाही. इथे कोरोनाचे संकट, त्यातून लोकांना वाचवायचे कसे?", असे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील कामाबद्दल म्हणाले.
"अनेक ठिकाणी लोकांना मृत्युला सामोरे जावे लागले, ती स्थिती महाराष्ट्रात होणार नाही; यासंबंध राज्याची यंत्रणा या कामाला कशी लावता येईल. या प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आणि माझ्या मते, त्या संकंटाच्या काळात त्यांनी जे धैर्य आणि जे प्रशासन दाखवले, त्याचे स्वागतच केले पाहिजे", असे कौतुक शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचे केले.