उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे मेट्रोचा खर्च वाढणार, प्रकल्प लांबणीवर पडणार; फडणवीसांचा घणाघात
By बाळकृष्ण परब | Published: October 11, 2020 09:26 PM2020-10-11T21:26:55+5:302020-10-11T21:33:16+5:30
Mumbai Metro News : मेट्रोची आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर फडणवीस यांनी ट्विट करून टीका केली.
मुंबई - मुंबईमेट्रोसाठी आरेमध्ये नियोजित असलेल्या कारशेडची जागा बदलून ती कांजूरमार्ग येथे करण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकारकडून आज शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे. मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
मेट्रोची आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर फडणवीस यांनी ट्विट करून टीका केली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले होते.
आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2020
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले.#Aarey
म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी 400 कोटी आधीच खर्च झालेले आणि स्थगितीमुळे 1300 कोटी पाण्यात गेले. शिवाय 4000 कोटींचा वाढीव भार पडणार आहे. तसेच कांजूरमार्ग येथील जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. आज त्यात आणखी किती वाढ होणार? एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार आहे. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठीही दिशाभूल आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 11, 2020
आज त्यात आणखी किती वाढ होणार?
एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर
आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते?
जनतेची किती मोठी ही दिशाभूल...
आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. एक म्हणजे आरेतील जागा जंगल घोषित केली आहे. आधी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून 800 एकरची व्याप्ती करण्यात आली आहे. आता मुंबईत 800 एकराचे जंगल असणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, आरेचे जंगल टिकवणे आपले काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे आरेतील प्रस्तावित मेट्रोचे कारशेड आता कांजूरमार्गला करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता आरेमध्ये मेट्रोचे कारशेड होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'कांजुरची जमीन शून्य रुपये किंमतीने सरकारने दिलेली आहे. त्यावर आता मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. आरे जंगलात साधारण 100 कोटींचा खर्च करून एक बिल्डिंग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डिंग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. तसेच, आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी सांगितले.