उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यात रस्त्यावर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:30 AM2019-04-23T01:30:04+5:302019-04-23T01:30:53+5:30
सत्ताधारी शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारची सभा घेण्यासाठी रस्त्याचा आसरा घ्यावा लागला आहे.
ठाणे : निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात यापूर्वी सहज मैदान, रस्ते उपलब्ध होत होती. परंतु, आता त्यावर कायदेशीर निर्बंध आल्याने मैदान आणि रस्ता सभांसाठी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीची सभेसाठी मैदान आणि रस्ता शोधमोहीम सुरू होती. अखेर, सत्ताधारी शिवसेनेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारची सभा घेण्यासाठी रस्त्याचा आसरा घ्यावा लागला आहे.
गेली कित्येक वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला शहरात साधे मैदान विकसित करता आलेले नाही. त्यामुळे आता रस्त्यावरच सभा घेण्याची नामुश्की त्यांच्यावर ओढवली आहे. रस्त्यावर सभा घेऊ नये, असे संकेत असतानाही त्याला परवानगी दिली कशी, याबाबत ठाणेकरांत संताप व्यक्त होत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. रॅली, चौकसभा झाल्यानंतर विविध पक्षांकडून प्रमुख नेत्यांच्या सभा घेण्याची सुरुवात झाली आहे. मागील काही दिवस सभा कुठे घ्यायची, असा मोठा पेच या मंडळींना पडला होता. सेंट्रल मैदानात ती घेता येऊ शकत नाही. गावदेवी मैदान नाही आणि शिल्लक राहिलेल्या शिवाजी मैदानात सभा घेण्यास परवानगी असली, तरी जागा मात्र छोटी, त्यामुळे सभा कुठे घ्यायची, असा पेच या मंडळींना पडला होता. अखेर, शिवसेनेने यात सत्तेच्या बळावर महापालिका मुख्यालयासमोरच सभा घेण्याचे निश्चित केले आहे. मागील काही दिवस त्यांच्याकडून मैदानांची चाचपणी सुरू होती. परंतु, मागील २५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असतानाही सत्ताधाऱ्यांना साधे मैदान विकसित करता आलेले नाही.