मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशाला उध्दव ठाकरेंचा हिरवा कंदील..? आशा बुचकेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:50 PM2019-03-06T20:50:51+5:302019-03-06T20:52:33+5:30
शरद सोनवणे यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारण देखील करण्यात आले होते.
पुणे : राज्यातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामे देतील,असे दबावतंत्र वापरून जि.प.गटनेत्या आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या भेटीस गेले होते. मात्र, ठाकरे यांनी या सर्व पदाधिका-यांची चांगलीच कानउघडणी केल्याने कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिका-यांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आ.शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आशाताई बुचके ह्या नेमक्या काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान,शरद सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांना मातोश्रीवर बोलविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
शरद सोनवणे यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मातोश्रीवर त्यांना पाचारण देखील करण्यात आले होते. सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशा बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेत आ.सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच अनेक पदावर काम करणा-या शिवसैनिकांनी सामुहिकरित्या आपल्या पदाचा राजीनामा देतील अशा तीव्र शब्दांत आपला पवित्रा जाहीर केला होता.
येत्या आठ दिवसात जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी असलेले माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, संभाजी तांबे, राजाभाऊ गुंजाळ, नगराध्यक्ष षाम पांडे व काही निवडक पदाधिका-यांना मातोश्रीवर बोलावून आ.सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिका-याने नाव न छापण्याचे अटीवर दिली आहे.
जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिका-यांची उध्दव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आ.सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशा बुचके यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.