राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:05 PM2021-03-25T15:05:02+5:302021-03-25T15:05:44+5:30
Union Minister and RPI (A) leader Ramdas Athawale met President Ram Nath Kovind today : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन दिल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
नवी दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकारवरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रातराष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यावतीने रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना दिले. (Union Minister and RPI (A) leader Ramdas Athawale met President Ram Nath Kovind today and submitted a memorandum on behalf of his party demanding the President's Rule in Maharashtra)
या भेटीत झालेल्या चर्चेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. याचबरोबर, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
Union Minister and RPI (A) leader Ramdas Athawale met President Ram Nath Kovind today and submitted a memorandum on behalf of his party demanding the President's Rule in Maharashtra pic.twitter.com/h8e7oOcmkH
— ANI (@ANI) March 25, 2021
राज्यातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. जोपर्यंत महाराष्ट्राचे राज्य सरकार बरखास्त होत नाही, तोपर्यंत या गंभीर आरोपांची निष्पक्ष सखोल चौकशी होणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच, कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकार मुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे राज्य सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबतचे निवेदन आज राष्ट्रपतींना दिले आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.