मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने केली शिविगाळ, मारायलाही धावले; तृणमूलच्या खासदाराचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:15 PM2021-07-24T15:15:41+5:302021-07-24T15:19:47+5:30
Politics News: तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेमध्ये आपल्याला शिविगाळ करून धमकावले. तसेच मारहाण करण्याचाही प्रयत्न केला असा आरोप शांतनू सेन यांनी केला आहे. दरम्यान, शांतनू सेन (Shantanu Sen) यांना सभागृहात केलेल्या गैरवर्तनाप्रकरणी राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. (Union Minister Hardeep Singh Puri insulted and even ran to beat; Serious allegations by Trinamool Congress MP Shantanu Sen.)
निलंबनाची कारवाई झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शांतनू सेन यांनी सांगितले की, राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर हरदीप पुरी यांनी माझ्याशी बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. तरीही मी त्यांच्या जवळ गेलो. तिथे जाताच त्यांनी मला धमकावण्यास सुरुवात केली. ते मला शिविगाळ करत होते. तसेच मला मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी मला घेरले होते. मात्र सुदैवाने माझ्या सहकाऱ्यांनी मला वाचवले, त्यासाठी मी देवाचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
माहिती तंत्रज्ञान आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव हे इस्राईली स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या करण्यात आलेल्या तथाकथित हेरगिरीबाबत सभागृहात उत्तर देत होते. त्याचवेळी तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधा पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातून कागद काढून घेत ते फाडून टाकले. त्यानंतर वैष्णव यांनी आपल्या उत्तराची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली.
दरम्यान, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी झालेल्या या घटनेचा उल्लेख केला. तसेच हा प्रकार अशोभनीय असल्याचे सांगितले. त्यामुळे सभागृहाच्या गरिमेला धक्का बसल्याचे सांगितले. त्यानंतर संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी शांतनू सेन यांना पावसाळी अधिवेशनातून निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभापतींनी सेन यांच्या निलंबनाची घोषणा करत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले होते.