Shivsena: एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळलेत, लवकर आमच्यात घेऊ; नारायण राणेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:12 PM2021-08-21T17:12:04+5:302021-08-21T17:36:38+5:30
मुंबई-ठाणे-वसई-विरार आमच्या हाती द्या. या भागचा विकास करुन दाखवू. माझ्यावर टीका केली तर मंत्रिपद मिळतं.
वसई – राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यात कुरघोडी सुरु असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नारायण राणे मुंबई, कोकणच्या दौऱ्यावर आहेत. वसईत नारायण राणेंनी थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेत ते शिवसेनेत कंटाळले असून त्यांना लवकर आमच्यात घेऊ. एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राणे म्हणाले की, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ सही पुरतं ठेवलं आहे. मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाही. ते शिवसेनेत कंटाळले असून आमच्याकडे आले तर त्यांना घेऊ. इतकचं नाही तर मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
तसेच मुंबई-ठाणे-वसई-विरार आमच्या हाती द्या. या भागचा विकास करुन दाखवू. माझ्यावर टीका केली तर मंत्रिपद मिळतं. मी ज्यांना शिवसेनेत आणलं ते माझ्यावर टीका करतात असं म्हणत नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंचा समाचार घेतला आहे.
भाजपा-मनसे युती झाल्यास आनंद
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला या राज ठाकरेंच्या विधानावर पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला असता राणेंनी मी राज ठाकरेंचा मुद्दा खोडत नाही असं म्हटलं. त्यानंतर भाजपा-मनसे युतीवर राणे यांनी दोन्ही पक्षांची युती झाल्यास आनंद होईल असंही म्हटलं.
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी ३२ गुन्हे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या प्रकरणी मुंबईत गुरुवारी १९ तर शुक्रवारी १३ असे एकूण ३२ गुन्हे दाखल करण्यात आले. या यात्रेच्या निमित्ताने मुंबईत जोरदार राजकीय वातावरण तापले होते. येत्या काळातही राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून राणे यांनी यात्रेला सुरुवात केली. तेथून टीचर्स कॉलनी हायवे, सायन सर्कल, दादर, वरळी नाका, गिरगाव चौपाटी, हुतात्मा चौक, अशा विविध मार्गांतून त्यांची यात्रा गेली. या वेळी कोरोनासंबंधित लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन झालेले पाहावयास मिळाले.
त्यानुसार, मुंबई पोलिसांनी शहरातील विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यांत भादंवि कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५१ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये, एकूण ३२ गुन्हे दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली आहे.