नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे कला शाखेतून झाले पदवीधर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:38 AM2020-11-18T05:38:00+5:302020-11-18T05:40:07+5:30
Eknath Shinde News: ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु, शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ कायम होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे येथून यंदा पदवीधर झालेल्यांच्या यादीत राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. कला शाखेतून एकनाथ शिंदे ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
ज्ञानपीठ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र असून दरवर्षी या केंद्राचा निकाल १०० टक्के लागतो. याही वर्षी निकाल १०० टक्के लागला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आमच्या विद्यालयाची निवड केली, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण या दोन विषयांची निवड केली होती, अशी माहिती विद्यालयाच्या केंद्र संयोजक तथा प्राचार्या प्रीती जाधव यांनी दिली.
ऐन उमेदीच्या काळात काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु, शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ कायम होती. त्यामुळे संधी मिळताच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुनश्च श्रीगणेशा केला होता. गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बी.ए. पदवीधर झालो याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पदवीधर झालेले
इतर विद्यार्थी
सुमन काकडे यांना ७७.७५ टक्के गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेतून इंग्रजी माध्यमात वैष्णवी म्हात्ने (८१.८३ टक्के), दर्शन नेरकर (७६.५८ टक्के), मराठी माध्यमात अरुण दिवेकर (७१.४२ टक्के) हे विद्यार्थी अंतिम वर्षाची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.