मावळमध्ये शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:41 PM2019-04-18T23:41:53+5:302019-04-18T23:42:09+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल आणि कर्जत हा शहरी भाग आहे.

 Urban voters are important in Mawal | मावळमध्ये शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा

मावळमध्ये शहरी मतदारांचा कौल महत्त्वाचा

Next

- विश्वास मोरे 
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल आणि कर्जत हा शहरी भाग आहे. त्या ठिकाणी नवीन मतदार नोंदणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
मावळ लोकसभेत शहरी भागाचे मतदान अधिक असल्याने मतदारांचा कौल मिळावा यासाठी दोन्ही उमेदवारांची स्पर्धा लागली आहे. मागील निवडणुकीत चिंचवड, पिंपरी आणि पनवेलमधून प्रथम स्थानावर शिवसेना, द्वितीय स्थानावर शेकाप आणि तृतीय स्थानावर राष्टÑवादी काँग्रेस होती.
शहरी मतदारांवरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असून पनवेल विधानसभा मतदार संघात सध्या प्रमुख पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, पनवेल, कर्जत, लोणावळा, तळेगाव अशी प्रमुख शहरे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत १७ लाखपैैकी ११ लाख ७२ हजार ८४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक ५ लाख १२ हजार २२६ मते श्रीरंग बारणे यांना, ३ लाख ५४ हजार ८२९ मते लक्ष्मण जगताप यांना, तर नार्वेकर यांना १ लाख ८२ हजार २९३ मते मिळाली होती. त्यांपैैकी शहरी मतदानाचा आढावा घेतला असता, शिवसेना-भाजपा युतीला ३ लाख ६९ हजार ७४० मते, शेकापला ३ लाख ३१ हजार ६२५ मते, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला १ लाख १८ हजार ९५५ मते मिळाली होती.
शहरी भागात युतीला अधिक मतदान मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर या मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला मतदार टिकवून ठेवल्याचे दिसते.
चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे ५१ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे ९, राष्टÑवादी काँग्रेसचे २२ नगरसेवक आहेत. चिंचवड, मावळ, पनवेल येथे भाजपाचे आमदार असून, पिंपरी आणि उरणमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. कर्जतमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा आमदार आहे. शहरांची तुलना केल्यास मावळ, पिंपरी, चिंचवड, पनवेल, उरण या पाचही ठिकाणी युतीची ताकत आहे. तसेच तळेगाव दाभाडे शहरात एकूण २७ नगरसेवकांपैकी भाजपाचे पंधरा, शहर सुधारणा समितीचे सहा आणि जनसेवा विकास समितीचे सहा असे पक्षीय बलाबल आहे. लोणावळ्यात २९पैकी १० भाजपा, काँग्रेस सात, आरपीआय एक, अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे. अपक्षांपैकी दोघेजण मूळ राष्टÑवादीचे आणि दोन भाजपाचे आहेत. उमेदवारांमध्ये सर्वाधिक स्पर्धा शहरी मतदारांची पसंती मिळविण्यासाठी असल्याचे प्रचार यंत्रणेवरून दिसत आहे.
>पनवेल, पिंपरी, चिंचवड मावळमध्ये अव्वल
शहरी भागातील तीन मतदारसंघांत महायुतीचे प्राबल्य आहे. तसेच या मतदारसंघांत नवमतदारांची संख्या वाढली आहे. चिंचवडमध्ये ११ हजार ८५९, पनवेलमध्ये ९ हजार १४७, पिंपरीत ५ हजार १८१ नवमतदार आहेत.
शहरी भागाबरोबर युवकांचा वाढलेल्या मतांचा टक्का कोणासाठी फायद्याचा ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मावळ लोकसभेतील नवमतदारांचा कोैल निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.
>शहरात महायुतीचे, ग्रामीण भागात महाआघाडीचे प्राबल्य
सन २०१४च्या निवडणुकीत शेकाप वेगळी लढली होती. या वेळी ही ताकद राष्टÑवादी काँग्रेसबरोबर आहे. घाटाखालील तीन मतदारसंघांतील ताकद तीन पक्षात विखुरली होती. ती आता दोन उमेदवारामध्ये विभागली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पनवेल या सर्वाधिक मतदार असलेल्या महापालिका भाजपाच्याच ताब्यात आहेत. त्या खालोखाल ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप अशी ताकद आहे.
>शहर शिवसेना राष्टÑवादी शेकाप
चिंचवड १,३७,७७२ १४,५२० ७३,५२९
पिंपरी ९५,८८९ २१०७१ ३८३५९
पनवेल ६९९७९ ४२६६१ ८१३२१
कर्जत ६६१०० ४०७०३ ३८४१६
एकूण ३,६९,७४० १,१८,९५५ २,३१,६२५
>२०१९ ला मतदार
४,७६,७८०
३,४१,७०१
५,१४,९०२
२,७५,४८०
१५,७८,८६३

Web Title:  Urban voters are important in Mawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.