अखेर उर्मिला मातोंडकर यांनी हाती बांधले शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
By बाळकृष्ण परब | Published: December 1, 2020 02:02 PM2020-12-01T14:02:38+5:302020-12-01T14:07:47+5:30
Urmila Matondkar joined Shiv Sena : उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई - गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेंनंतर प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज आपल्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नावाची शिफारस करण्यात आल्यापासून उर्मिला मातोंडकर ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चेला शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला होता. तसेच उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने शिवसेनेची महिला आघाडी भक्कम होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.
उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्या काही काळ राजकारणापासून दूर होत्या. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय चर्चेत आल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे तसेच उर्मिला मातोंडकर यांनीही हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत होते.
अभिनेत्री @UrmilaMatondkar जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/lAv21HjbaH
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) December 1, 2020
दरम्यान, उर्मिला मातोंडकर या आज संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांनी काल केले होते.