ऊर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवलीतील प्रचार फेरीत भाजपची हुल्लडबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:38 AM2019-04-16T05:38:54+5:302019-04-16T05:40:17+5:30

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी बोरीवली पश्चिम विभागात रॅली काढण्यात आली होती.

Urmila Matondkar's rally in Borivli, BJP's ruckus | ऊर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवलीतील प्रचार फेरीत भाजपची हुल्लडबाजी

ऊर्मिला मातोंडकर यांच्या बोरिवलीतील प्रचार फेरीत भाजपची हुल्लडबाजी

Next

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी बोरीवली पश्चिम विभागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाजपचे झेंडे खांद्यावर घेतलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी केली. तरुणांनी विकृत हावभाव करीत ‘मोदी’ यांच्या नावाच्या घोषणाही दिल्या. या सर्व प्रकारामुळे पुरते गोंधळून गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ऊर्मिला मातोंडकर यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
बोरीवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काही लोक भाजपचे झेंडे घेऊन त्या ठिकाणी आले. त्यांनी फेरीत सहभागी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या फेरीत सहभागी असलेले गोराईचे माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० तरुणांचा एक घोळका घटनास्थळी आला. त्यांनी ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातील काही लोकांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडे पाहत विकृत हावभाव केले, असेही शेट्टी यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या धक्काबुक्कीत एक प्रवासी महिला खाली पडून किरकोळ जखमी झाली.
या प्रकरणी ऊर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक अधिकारी आणि बोरीवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. माझ्या प्रचारफेरीदरम्यान २५ ते ३० गुंडांनी भाजपचा झेंडा घेत महिलांच्या दिशेने पाहत विकृत हावभाव केले. घडलेल्या या प्रकारामुळे मला मानसिक त्रास झाला. परिणामी, सर्व प्रचारफेऱ्या आणि बैठकीसाठी मला पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे, असे बोरीवली पोलिसांना दिलेल्या लेखी पत्रात ऊर्मिला यांनी म्हटले आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बोरीवली पोलीस त्यानुसार घटनास्थळीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळून पाहत असून, या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
>‘आचारसंहितेचे उल्लंघन होते आहे’
हे काही पहिल्यांदा झाले नाही. माझ्या धर्मावर, माझ्या नावावर, माझ्या खासगी आयुष्यावर टीका करण्यात आली आहे. ज्यांनी गोंधळ घातला ते सर्वसामान्य नागरिक नव्हते. आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. भाजप कार्यकर्ते आम्हाला धमकावत आहेत. घाबरवत आहेत. माझ्यासह माझ्या महिला सहकारी वर्गाच्या सुरक्षेसाठी पोलीस तक्रार दाखल करावी लागत आहे. आपल्याला आपली लोकशाही वाचवायची आहे.
- ऊर्मिला मातोंडकर,
काँग्रेस उमेदवार, उत्तर मुंबई
>छुपे हल्ले करून निवडणूक लढवू नका
बोरीवलीतील घटनेचा निषेध आहे. पोलिसांनी घडलेल्या घटनेची दखल घेत गुन्हेगारांवर योग्य कारवाई करावी. जसा काँग्रेसला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे; तसा भाजपला त्यांचा प्रचार करण्याचा अधिकर आहे. जनतेलाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी हल्ला करणे योग्य नाही. आणि काँग्रेसची एक जुनी सवय आहे. आपणच करायचे आणि दुसºयावर आरोप करायचे. दंगल स्वत: करायची आणि आरोप दुसºयावर लावायचे. हिंमत असेल तर कामाच्या बळावर, मेरिटवर निवडणूक लढवावी. छुपे हल्ले करून निवडणूक लढवू नका. आता डिपॉझिट वाचणार नाही हे काँग्रेसच्या लक्षात आले आहे. परिणामी, अशी कृत्ये करत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे.
- गोपाळ शेट्टी, भाजप उमेदवार, उत्तर मुंबई

Web Title: Urmila Matondkar's rally in Borivli, BJP's ruckus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.