ऊर्मिलाच्या प्रवेशामुळे भाजपपुढे तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 05:54 AM2019-04-21T05:54:43+5:302019-04-21T05:55:19+5:30
राड्यामुळे वाढली चुरस; एकतर्फी लढत होण्याचे अंदाज मिळाले धुळीस
- सचिन लुंगसे
२०१४ मध्ये चार लाखांच्या मताधिक्याने जिंकलेले भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना या वेळी आव्हान दिले आहे ते अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी.
शेट्टी यांच्याकडे अनुभव, संघटनात्मक ताकद असली, तरी निवडणुकीच्या रिंगणात आयत्यावेळी उतरलेल्या ऊर्मिला मांडत असलेले मुद्दे, त्यांना मिळणारा प्रतिसाद यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी दोनदा राडा केल्याने त्या पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे ही लढत एकतर्फी न होता, चुरशीची होईल, असे स्पष्ट दिसू लागले आहे.
काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर या राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांच्या कुटुंबाची वैचारिक बैठक, सामाजिक कामाबद्दल असलेली जाण, विषय-मुद्दे मांडण्याची हातोटी यामुळे; तसेच अभिनेत्री असल्याने त्यांच्याविषयी आकर्षण आहे. ते त्यांच्या प्रचारसभा-चौकसभांत दिसते. मनसेसारख्या मुंबईत सतत चर्चेत असलेल्या पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. त्या पक्षाच्या मतदाराने खरोखरीच मातोंडकर यांना बळ दिले आणि त्याचपद्धतीने आघाडीतील राष्ट्रवादीनेही काम केले, तर शेट्टी यांचे मताधिक्य दीड-दोन लाखांनी घटू शकते, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. सर्वसामान्यांत मिसळणे, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा, झोपड्यांसह कच्च्या वस्त्यांतील मुद्दयांची हाताळणी, त्याचवेळी उच्चभ्रू मतदारांना दिलेला विश्वास, रेल्वेसह अन्य प्रवाशांच्या प्रश्नांबाबत चर्चा या पद्धतीने त्यांच्या प्रचाराची आखणी दिसून येते.
भाजपच्या संघटनात्मक ताकदीपेक्षा उर्मिला यांचे मुद्दे, ग्लॅमर सरस ठरू लागताच त्यांच्या प्रचारसभेत दोन वेळा घुसून भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ, त्यावरील आरोप-प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक भाजपसाठी एकतर्फी उरलेली नाही, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे मतदार बॉलीवूडला प्राधान्य देतात की, आहे त्याच उमेदवाराचा पुन्हा विचार करतात यावर येथील निकाल अवलंबून आहे.
हिंमत असेल तर केलेल्या कामाच्या बळावर, मेरिटवर निवडणूक लढवावी. काँग्रेसला आता लक्षात आले आहे की, त्यांचे डिपॉझिटही वाचणार नाही. या मतदारसंघातील लोक समजूतदार आहेत. कोण खरे आणि कोण खोटे? हे सगळे लोकांना कळते आहे. देश मोदीमय झाला आहे. त्याचा फायदा मिळेल.
- गोपाळ शेट्टी, भाजप.
पाच वर्षांत देशातील वातावरण कमालीचे वाईट झाले आहे. या परिस्थितीत माझे काम, मला मिळणारा पाठिंबा हेच माझ्या विरोधकांना उत्तर आहे. भावनिक मुद्दे हाताळणे ही कामे भाजपची आहेत. मागील साडेचार वर्षांत त्यांनी हे काम उत्तम केले आहे. मी माझ्या आताच्या कामावर विश्वास ठेवते.
- ऊर्मिला मातोंडकर, काँग्रेस
कळीचे मुद्दे
झोपड्यांच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर ऊर्मिला यांनी शेट्टी यांना कोंडीत पकडले आहे. त्या मतदारावर लक्ष केंद्रित केले आहे.
पश्चिम उपनगरातील रेल्वेचे न सुटलेले प्रश्न, हव्या त्या प्रमाणात न मिळालेल्या सुविधाही मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत.