आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 08:42 PM2021-03-21T20:42:27+5:302021-03-21T20:43:42+5:30
Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे.
नवी दिल्ली - परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आज सकाळपासूनच मुंबई आणि दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. त्याचदरम्यान, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे. (For us, the issue of Sachin Vaze is over, Sanjay Raut's challenge to the opposition by making a big statement from Delhi)
सचिन वाझे हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय कुणालाही नोकरीवर घेतलं जात नाही. अर्थात त्यासाठी राज्य शासनाची मान्यता लागते. पण शेवटी शिफारस ही राज्याचे पोलीस प्रमुख, मुंबईचे पोलीस प्रमुख हेच करतात. आमच्यासाठी आता वाझे हा विषय संपला आहे.
दरम्यान, आज परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संजय राऊत यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. सरकार हे विरोधी पक्षासाठी चालवले जात नाही. तर ते राज्यासाठी राज्यातील जनतेसाठी चालवले जाते. आता विरोधकांकडे बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.
विरोधकांची प्रत्येक मागणी ही सत्यावर आधारित असते असे नाही. सध्या उठसूट राजीनामा मागण्याचा उद्योग विरोधकांनी सुरू केलाय, असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. तसेच अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मिळून घेतील, अशी माहितीही राऊत यांनी दिली.