राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 14, 2021 07:10 PM2021-01-14T19:10:11+5:302021-01-14T19:11:35+5:30
भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असे हसन यांनी म्हटले आहे.
लखनौ - अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी यासाठी देणगी जमवणेही सुरू केले आहे. सांगण्यात येते, की मंदिरासाठी आतापर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षाही अधिक देणगी जमा झाली आहे. यातच आता मुरादाबाद येथील समाजवादी पार्टीचे खासदार एसटी हसन यांनी राम मंदिरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुकीत फायद्याच्या दृष्टीने, उत्तर प्रदेशात राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्या लोकांवर भाजप दगडफेक करवून घेऊ शकते, असा आरोप त्यांनी केला आहे.
सपा खासदाराने भाजपवर राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असेही हसन यांनी म्हटले आहे.
एसटी हसन म्हणाले, “राम मंदिराचा मुद्दा संपला आहे. मात्र, भाजपचे लोक देणगीसाठी जेव्हा बाहेर येतील, तेव्हा काही मुस्लीम लोक त्यांच्यावर दगडफेक करतील. आपण बघितले आहे, की मध्य प्रदेशात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर काय झाले. यातून हिंदूंनाही मेसेज दिला जाईल, की तेही असे करू शकतात.”
भाजपचे राजकारण ओळखण्याची आवश्यकता आहे. किती काळ अशा प्रकारचेच राजकारण सुरू राहणार. भाजप बरोबर निवडनुकीपूर्वीच हिंदू-मुस्लीम यांच्यातील एक्य तोडण्याचा प्रयत्न करू शकते, असेही हसन म्हणाले.
यानंतर, यूपी सरकारमधील मंत्री मोहसिन रजा यांनी एसटी हसन यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार करणारे आज दगडफेकीची भाषा करत आहेत. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे उत्तर प्रदेशात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अखिलेश यादव यांनी स्पष्ट करावे, की ते राम मंदिराच्या बाजूने आहेत, की राम मंदिराच्या विरोधात.