"राज्यात २८० ग्रामपंचायतीवर वंचितची एक हाती सत्ता"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 09:50 PM2021-01-21T21:50:40+5:302021-01-21T21:51:45+5:30
vanchit bahujan aghadi : दिल्लीत झालेल्या शाईन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली.
मुंबई : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीचे तीन हजार ७६९ उमेदवार विजयी झाले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा राज्यात ग्रामपंचायतवरती विजय मिळवणारा मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दिल्लीत झालेल्या शाईन बाग आंदोलनाच्या धर्तीवर देशभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत माहिती दिली राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन हजार ७६९ उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले आहे तर २८० ग्रामपंचायतीवर वंचितने एक हाती सत्ता मिळवली आहे. ही सर्व माहिती आकडेवारी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा, तालुकास्तरावर घेतलेल्या अधिकृत माहितीवरून दिली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
याचबरोबर, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे. 'सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला व्हॉट्स ऍप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजले. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.