प्रवीण राऊतच्या कंपन्यांत वर्षा राऊतही भागीदार? ईडीला संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:04 AM2021-01-03T07:04:01+5:302021-01-03T07:04:56+5:30
ED on Varsha Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीच्या चौकशीवेळी राऊत यांच्या पत्नीकडे याबाबत सविस्तर विचारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पीएमसी बँकेतील ठेवीमुळे चर्चेत आलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची ७२ कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांच्या चार कंपन्यांमध्ये वर्षा राऊत यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे. ५ जानेवारीच्या चौकशीवेळी त्यांच्याकडे याबाबत सविस्तर विचारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू आहे. २९ डिसेंबरला त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून घेतली.
दरम्यानच्या काळात ईडीने शुक्रवारी प्रवीण राऊत आणि त्यांची पत्नी माधुरी यांच्या मालकीची ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यांच्या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्याच्याशी संलग्न रॉयटर्स एंटरटेन्मेंट, एलएलपी आणि सनातन मोटर्स या अन्य तीन कंपन्यांमध्ये वर्षा यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.