Video: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांची कृष्णकुंजबाहेर गर्दी; राज ठाकरेंना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 10:27 AM2020-09-18T10:27:31+5:302020-09-18T10:28:03+5:30
वरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज बाहेर गर्दी केली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी दिली. मागील विधानसभेत राज ठाकरे यांच्या मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता.
वरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हे लोक मनसेचा झेंडा हाती घेणार आहेत. वरळीतील लोकांनी आदित्य ठाकरेंना निवडून दिलं होतं. परंतु काही महिन्यात येथील नागरिकांना त्यांच्या कामाची प्रचिती आली, अनेकांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे कृष्णकुंज निवासस्थानी या नागरिकांचा मनसेत प्रवेश होणार असल्याचं संतोष धुरींनी सांगितले.
वरळीतील नागरिकांची राज ठाकरेंच्या कृष्णकुंजबाहेर गर्दी, सर्वजण मनसेत प्रवेश करणार @mnsadhikrut@RajThackeraypic.twitter.com/WCVR0TSMiW
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2020
काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना राणौत वादावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना साद घातली होती. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं सांगत राऊत यांनी राज ठाकरेंना साद घातली होती.
तर मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, पण ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली होती. तर महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादेबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं होतं.
गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई, औरंगाबाद, ठाणे याठिकाणी इतर पक्षातून मनसेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबाद येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे समर्थक सुहास दशरथे, नेते प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर सुहास दशरथे यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिकांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरेंच्या हस्ते मनसेत प्रवेश केला आहे.