Video: “शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना”; संभाजीनगर नामांतरणावरून भाजपाची बोचरी टीका
By प्रविण मरगळे | Published: January 5, 2021 03:33 PM2021-01-05T15:33:12+5:302021-01-05T15:34:36+5:30
१९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला
मुंबई - औरंगाबादचं संभाजीनगर करण्यात यावं अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं सूपर संभाजीनगर घोषणा केली आणि संभाजीनगर नामांतरण झालं पाहिजे अशी मागणी केली, शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत केशव उपाध्ये म्हणाले की, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यापद्धतीने बोलावले आणि जी वागणूक दिली, त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागते, त्यामुळे शिवसेनेला औरंगजेब सेना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष नामांतरणावेळी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९५ मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महापालिकेत संभाजीनगर नामांतरण करण्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला तेव्हाचे संभाजीनगरचे पालकमंत्री चंद्रकांत खैरे, जालनाचे पालकमंत्री हरिभाऊ बागडे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मांडला, त्याला युती सरकारने मंजुरी दिली, त्यानंतर काँग्रेस नगरसेवक मुश्ताक अहमद जे सध्या राष्ट्रवादीत आहेत, ते हायकोर्टात गेले. तेथे हायकोर्टाने त्यांचे म्हणणं फेटाळलं, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार आलं, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांतरणाची सूचना मागे घेत असल्याचं सांगितले अशी माहिती केशव उपाध्येंनी दिली.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद https://t.co/l6Bw78kptD
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 5, 2021
त्याचसोबत २०११ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अशाप्रकारचा प्रस्ताव आला, त्याकाळातही आघाडी सरकारने हा प्रस्ताव पुन्हा फेटाळला, एकदा नव्हे दोनदा काँग्रेस राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळला आज त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत आहे. २०१७, २०१८, २०१९, २०२० या काळात सातत्याने औरंगाबद महापालिकेत भाजपा औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करण्यात यावं असा प्रस्ताव आणण्याची मागणी केली, २० डिसेंबर २०१९ रोजीही भाजपाने स्मरण पत्र पाठवून शिवसेनेला आठवण करून दिली. मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव शिवसेनेने महापालिकेत दाखल करून घेतला नाही. बोर्डावरदेखील प्रस्ताव ठेवला नाही. भाजपा नगरसेवक राजू शिंदे यांनी पुन्हा स्मरण पत्र पाठवून चौथ्यांदा प्रस्तावाची आठवण करून दिली, त्यावर शिवसेनेच्या महापौरांनी वारंवार स्मरण पत्र देऊ नये असं भाजपा नगरसेवकाला बजावलं, ते महापालिकेच्या इतिवृत्तात आहे असा आरोप केला.
भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तेव्हा ५ जुलै २०१७, ७ ऑगस्ट २०१८, २२ नोव्हेंबर २०११ मध्ये तीन पत्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतरण करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असं महापालिकेला पाठवलं, त्यावेळीही शिवसेनेने अशाप्रकारे प्रस्ताव देऊ नका असं नेत्यांना बजावलं, ज्यांची प्रामाणिक इच्छा असते, ते अशाप्रकारे वेळकाढूपणा करत नाहीत. औरंगाबाद नामांतरणाची प्रत्यक्ष वेळ आली तर शिवसेनेची वृत्ती आणि कृती यात फरक दिसतो. त्यामुळे औरंगजेबाची वृत्तीप्रमाणे शिवसेना कृती करतेय असा आरोप केशव उपाध्येंनी केला आहे.