VIDEO: मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणकरांनी मांडल्या तीव्र शब्दात व्यथा, केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 01:57 PM2021-07-25T13:57:04+5:302021-07-25T14:01:03+5:30
Chiplun Flood Update: उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला भेट देऊन शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणवासियांनी मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र शब्दांत आपल्या वेदना मांडल्या.
चिपळूण - मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी प्रचंड वित्तहानी झाली आहे. शहरातील बाजारपेठ पुरामुळे कोलमडली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला भेट देऊन शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणवासियांनी मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र शब्दांत आपल्या वेदना मांडल्या. (Chiplunkar's express their grief in sharp words in front of the Chief Minister Uddhav Thackeray)
पुराच्या काळात आम्हाला मदत मिळाली नाही. पूरपरिस्थितीदरम्यान, मदतीसाठी झालेल्या उशिरासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी चिपळूणवासियांनी केली. तसेच पुरामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. आम्हाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकदा कर्जमाफी द्या आणि दोन टक्के दराने कर्ज द्या अशी विनंती चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला तुमच्या पायावर कसे उभे करायचे याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांसमोर चिपळूणवासीयांनी तीव्र शब्दात व्यक्त केल्या व्यथा pic.twitter.com/JSLPhwOz70
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021
चिपळूणमध्ये पुरामुळे झालेल्या मोठ्या आर्थिक हानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणच्या दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री आज सकाळी मुंबईहून गुहागर येथे आले. तेथून ते रस्ते मार्गाने चिपळूणमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे दाखल होताच त्यांनी चिपळूण बाजारपेठ येथे जाऊन व्यावसायिक, दुकानदार यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, त्यांच्याशी बोलले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते होते. चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये मुख्यमंत्री आढावा बैठकही घेणार आहेत.