Video: बाबो! चक्क मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो स्थानकावर 'भाऊगर्दी'; कोरोनावरून मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:50 PM2021-05-31T17:50:25+5:302021-05-31T17:51:45+5:30
CM Uddhav Thackeray Warn on Corona Crisis to people: मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील दाखविला त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मेट्रो स्थानकावर झालेली भाऊगर्दी दाखविली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उभारण्यात आल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी देखील आज सुरु करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाला जेवढी मेट्रोमध्ये जाण्यासाठी नसते तेवढी गर्दी कोरोना काळात जमल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. यावर मनसेच्या नेत्यांनी टीका केली आहे. (Huge Crowd when CM uddhav Thackeray flag off to Akurli metro Station )
Mumbai Metro : मेट्रो ट्रायल रनच्या कार्यक्रमादरम्यान भाजपचं काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन
मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदील दाखविला त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत मेट्रो स्थानकावर झालेली भाऊगर्दी दाखविली आहे. ''लोका सांगे ब्रह्मज्ञान... मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना नियमांना हरताळ फासला जातोय, मग त्याचं खापर लोकांवर कशाला फोडताय? मेट्रो चाचणी उद्घाटन कार्यक्रमाला गर्दी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
मेट्रोच्या आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज चढविण्यात आला होता. स्थानकाच्या फलाटावर चाचणीसाठीची मेट्रो मोठ्या दिमाखात उभी होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर चाचणी होणाऱ्या मेट्रोला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वच्छ आणि सुंदर अशा आकूर्ली मेट्रो स्थानकावर सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी साठीच्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला; आणि चाचणी करिता मेट्रो धावू लागली.
First Ever Trial Run of the Metro Line 2A & 7 - LIVE https://t.co/ltdC6rZ20q
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 31, 2021
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी म्हणाले की, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरु झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्टयातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता, ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल, असे मेट्रोचे फायदे आहेत. बीईएमएल, बंगळुरु हे हिटाची, जपान यांच्या तांत्रिक सहकार्याने मेट्रोचे सेट तयार करत आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करत हे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असेल.