Video: मनसे शाखेसाठी ६५ वर्षीय आजी उपोषणाला बसली; राज ठाकरेंनी फोन करताच चक्र वेगाने फिरली
By प्रविण मरगळे | Published: January 12, 2021 04:14 PM2021-01-12T16:14:53+5:302021-01-12T16:19:01+5:30
शहापूरच्या खर्डी येथे मनसेची शाखा ग्रामपंचायतीने तोडली, मात्र ही शाखा तोडली म्हणून मनसेच्या तरूण कार्यकर्त्यांनाही लाजवेल असा उत्साह असलेली ६५ वर्षीय आजी उपोषणाला बसली
प्रविण मरगळे
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लोकप्रियता किती आहे हे सांगण्याची कोणालाही गरज नाही, सत्ता असो वा नसो राज ठाकरेंभोवती कार्यकर्त्यांचे जाळं नेहमी कायम असतं, मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच विधानसभेत १३ आमदार निवडून गेले, यातील अनेक आमदारांनी मनसेची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. मागील २ विधानसभा निवडणुकीतही मनसेला हवं तसं यश आलं नाही पण कार्यकर्त्यांची जिद्द आणि उत्साह असाच कायम असल्याचं शहापूर येथील एका घटनेवरून पाहायला मिळालं आहे.
शहापूरच्या खर्डी येथे मनसेची शाखा ग्रामपंचायतीने तोडली, मात्र ही शाखा तोडली म्हणून मनसेच्या तरूण कार्यकर्त्यांनाही लाजवेल असा उत्साह असलेली ६५ वर्षीय आजी उपोषणाला बसली, गेल्या ३ दिवसांपासून खर्डी येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल खुद्द राज ठाकरेंनी घेतली आणि चक्र वेगाने फिरली. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज त्या आजींची भेट घेतली.
या भेटीनंतर अविनाश जाधव आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनाशी बोलणी झाली, यात संबंधित ग्राम पंचायत सदस्यांनी मनसेची शाखा पुन्हा स्वखर्चाने बांधून देण्याचे कबुल केले. तसेच येत्या काही दिवसातच मनसेची शाखा त्याच भागात ग्रामपंचायतीच्या खर्चातून उभी राहील असंही सांगण्यात आलं आहे. मनसेची ही शाखा वाचवणाऱ्या या आजीचं कौतुक पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोन करून केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्षसंघटनाच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहेत, मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली, यात राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.
'महाराष्ट्र रक्षक' पथक कृष्णकुंजवर तैनात
महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरेंची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. मागील सरकारच्या काळात राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यानंतर मनसैनिकांनी दिवसरात्र राज ठाकरेंना संरक्षण दिलं होतं, त्यावेळी प्रत्येक विभागातील पदाधिकारी टप्प्याटप्प्याने राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी संरक्षण देण्यासाठी हजर राहत होते, त्याचप्रमाणे आताही मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेच्या महाराष्ट्र रक्षक पथकाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र रक्षक नावाने टी-शर्ट छापून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना संरक्षण देणार आहेत, बोरिवली-कांदिवली परिसरातील हे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर तैनात होते, सरकारच्या निर्णयाचा सरचिटणीस नयन कदम यांनी जोरदार विरोध करत आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक आहोत असं सांगितले आहे.