Video: भेटायला आलेल्या डबेवाल्यांना राज ठाकरेंचा चिमटा; “सरकार त्यांच्या हातात द्या अन्…
By प्रविण मरगळे | Published: September 24, 2020 04:49 PM2020-09-24T16:49:27+5:302020-09-24T18:29:16+5:30
लॉकडाऊनमुळे डब्बेवाल्यांचा रोजगार बुडाला, गेली ६ महिने रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. डब्बेवाला कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबई – अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणासाठीही रेल्वे सेवा सुरु नसल्याने मुंबईतील डब्बेवाल्यांची मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करा यामागणीसाठी मनसेने काही दिवसांपूर्वी सविनय कायदेभंग आंदोलन केले, या आंदोलनाला मुंबई डब्बेवाला संघटनेने पाठिंबा दिला. यानंतर आज संघटनेच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
मुंबई डब्बेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आपल्या प्रश्नांचे निवेदन राज ठाकरेंना दिले. यात त्यांनी म्हटलं आहे की, लोकल सेवा सुरु करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून मुंबई डब्बेवाला रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मुंबई हळू हळू पुर्वपदावर येत आहे काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत ज्या कार्यालयात शक्य आहे तेथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तो पर्यंत डबेवाला आपली सेवा पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. एकतरं डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या किंवा डब्बेवाल्यांना अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून रेल्वेने प्रवास करु द्या. या दोन्ही मागण्यांकडे प्रशासानाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मनसेने जे आंदोलन उभं केले ते मुंबईकरांसाठी होतं, म्हणून त्याला डब्बेवाला संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे.
त्याचसोबत लॉकडाऊनमुळे डब्बेवाल्यांचा रोजगार बुडाला, गेली ६ महिने रोजगार नसल्याने आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे. डब्बेवाला कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात ठाकरे सरकारने असंघटित कामगारांना मदत म्हणून कामगारांच्या खात्यावर ५ हजार रुपये दिले. मात्र बहुतांश असंघटित कामगार परप्रांतीय आहे. त्यांना मदत मिळते पण डब्बेवाले भूमिपुत्र असून त्यांना ५ हजाराची मदत का दिली जात नाही? असा प्रश्नही डब्बेवाल्यांनी राज ठाकरेंकडे मांडला.
'मुंबईचे डबेवाले' मनसे अध्यक्ष @RajThackeray ह्यांच्या भेटीला, रेल्वे प्रवासाला परवानगी मिळावी यासाठी डबेवाल्यांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर.#MumbaiDabawala#मुंबईचाडबेवालाpic.twitter.com/61K3khCExr
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 24, 2020
त्यामुळे मनसेच्या वतीने हे प्रश्न सरकारकडे मांडावे अशी विनंती मुंबईच्या डब्बेवाल्यांनी केली, राज ठाकरे यांनीही डब्बेवाल्यांना आश्वासन देत मी याबाबत सरकारशी बोलतो असं आश्वासन दिलं, पण एरव्ही शिवसेनेशी जवळीक ठेवणारे डब्बेवाले भेटायला आल्याने जाता जाता राज ठाकरेंनी डब्बेवाल्यांना चिमटा काढला, सत्ता त्यांच्या हातात द्या अन् प्रश्न माझ्याकडे आणा असं राज ठाकरेंनी सुनावलं.