Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर
By पूनम अपराज | Published: December 28, 2020 03:54 PM2020-12-28T15:54:05+5:302020-12-28T15:55:14+5:30
ED And Shivsena : पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला आहे
एकीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. त्यानंतर याबाबत संजय राऊत पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काही शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला आहे. त्यानंतर त्वरित पोलीस बॅनर उतरवण्यासाठी आले असता त्यांना त्या शिवसैनिकांनी बॅनर उतारवण्याबाबत कारवाई महापालिका करेल असे म्हणाले असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. मात्र, तरीदेखील पोलिसांनी हा बॅनर उतरवला आहे. त्यामुळे ईडी नोटीशीवरून राजकीय घमासान सुरु झाल्याचे दिसत आहे.
तसेच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा वादंग निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने रविवारी यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. या बॅनर्सचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितले. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेले आहेत. मात्र, पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला. मंगळवार २९ डिसेंबर रोजी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर pic.twitter.com/dAM8QQ9Hbo
— Lokmat (@MiLOKMAT) December 28, 2020
ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल
पत्रकार परिषदेत संजय राऊत काय बोलले ?
'केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारं वापरावी लागतात. त्यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या. भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेत असलेले नेते जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात. पूर्वी सीबीआय, ईडीनं कारवाई केली की लोकांना त्याबद्दल गांभीर्य वाटायचं. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या कारवाया म्हणजे केंद्रातल्या पक्षानं भडास काढणं हे लोकांनी गृहित धरलंय,' अशा शब्दांत राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 'गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ३ नेते ईडीच्या कार्यालयात जातात. तिथून ते काही कागदपत्रं घेऊन बाहेर येतात. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि त्यांचे हस्तक मला भेटायचा प्रयत्न करत आहेत. राज्यातलं सरकार टिकू देऊ नका म्हणून माझ्यावर विविध मार्गांनी दबाव आणला जात आहे,' असा गंभीर आरोप त्यांनी केला.