Video: हाथरस बलात्कार प्रकरणातील दोषींचा एन्काऊंटर होणार?; भाजपा नेत्याचे मोठे संकेत
By प्रविण मरगळे | Published: September 30, 2020 03:32 PM2020-09-30T15:32:38+5:302020-09-30T15:43:37+5:30
Hathras Gangrape Case: कार उलटताच दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न करत केला. यातच पोलिसांच्या चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्काराने संपूर्ण देशात संताप पसरला आहे. या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. मंगळवारी या घटनेतील पीडित मुलीने अखेरचा श्वास घेतला, परंतु या बलात्काराच्या घटनेने देशभरातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. .
दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा हाथरसमधील घटनेने सर्वांच्या मनात चीड निर्माण केली आहे. बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी कडक पाऊल उचलणं गरजेचे आहे अशी मागणी होत आहे. यातच हाथरस प्रकरणातील दोषींबाबत भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी मोठे संकेत दिले आहेत. या घटनेतील सर्व आरोपींना पकडण्यात आल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच दोषींना जेलमध्ये पाठवण्यात येईल, परंतु योगी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत, मला माहिती आहे की, त्यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते असं सांगत त्यांनी उत्तर प्रदेशातील गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरची आठवण करून दिली. ८ पोलिसांचे हत्याकांड घडवणाऱ्या विकास दुबेला पोलिसांनी एन्काऊंटरमध्येच मारलं होतं. विकास दुबेला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला कानपूरला नेलं जात होतं, तेव्हा पोलिसांच्या कारला अपघात झाला, विकास दुबे याच कारमध्ये होता. कार उलटताच दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न करत केला. यातच पोलिसांच्या चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला. त्यामुळे कैलास विजयवर्गीय यांनी केलेल्या विधानांचा अर्थ असा की यातील दोषींचाही एन्काऊंटर होऊ शकतो.
#WATCH The accused have been arrested. The case has been sent to a fast-track court. The accused will be sent to jail... Yogi Ji jo wahan ke CM hain, main jaanta hun ki unke pradesh main kabhi bhi gaadi palat jati hai: BJP leader Kailash Vijayvargiya on #Hathras gang-rape case pic.twitter.com/ksSERx3nu0
— ANI (@ANI) September 30, 2020
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील दोषींना वाचवले जाणार नाही. घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, हे पथक पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करेल. वेगवान न्याय मिळावा यासाठी या खटल्याची सुनावणी फास्ट- ट्रॅक न्यायालयात करणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
दोषींवर कठोर कारवाई करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. नरेंद्र मोदींनी या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली. यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले.