Vidhan Sabha Adhiveshan: नाना पटोलेंचा गंभीर आरोप; विधानसभेत का झाला ‘अमजद खान’चा उल्लेख?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 03:30 PM2021-07-06T15:30:10+5:302021-07-06T15:36:39+5:30
Vidhan Sabha Adhiveshan Live Update: हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? असा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला.
मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी फोन टॅपिंग मुद्द्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले यात माझा नंबर अमजद खान नावानं टॅप करण्यात आला असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.
सभागृहात नाना पटोले(Nana Patole) म्हणाले की, हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्यात यावी. अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
तसेच माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे असा आरोप करत नाना पटोलेंनी भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उद्याच या प्रकरणी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहितीही घेऊ असं सभागृहाला सांगितले.
सभागृहाला गांभीर्याने विचार करण्याची गरज
नाना पटोले यांनी सभागृहात जो मुद्दा मांडला त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गृहमंत्री या सभागृहात उपस्थित आहेत. त्यांनी या घटनेची सत्यता पडताळून लोकांसमोर आणलं पाहिजे. भविष्यामध्ये असा प्रकार सभागहातील इतर सदस्यांसोबतही घडू शकतो त्यामुळे गृहखात्याने त्याची संपूर्ण चौकशी करून या सगळ्या गोष्टी समोर आणल्या पाहिजेत अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली.
आमदार प्रताप सरनाईकांची विधानसभा सभागृहात मागणी #PratapSarnaik#MaharashtraAssemblyhttps://t.co/MClqN9Ocvp
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021