Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 08:34 PM2024-10-22T20:34:30+5:302024-10-22T20:35:36+5:30
Third Alliance in Maharashtra News: बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी एकत्र येत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने काही मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
नितीन काळेल, सातारा
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी ‘परिवर्तन महाशक्ती’ने (Third Alliance in Maharashtra) तयारी केली असून, मंगळवारी साताऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघ लढविण्याची भूमिका घेण्यात आली. तसेच या बैठकीत अनेकांनी उमेदवारीची मागणीही केली. पण, वरिष्ठ स्तरावरुन उमेदवारी जाहीर होईल त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. Third Alliance in Maharashtra Latest News)
सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी तसेच महायुतीचे उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आतापर्यंत तीन मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे. अशातच आता ‘परिवर्तन महाशक्ती’ही सक्रीय झाली आहे.
परिवर्तन महाशक्ती... तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत काय झाली चर्चा?
या संघटनेची बैठक मंगळवारी साताऱ्यात पार पडली. या बैठकीला प्रहार जनशक्ती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आदींचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
साताऱ्यातील ही बैठक सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली आहे. यामध्ये सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मते मांडली. जिल्ह्यातील सर्वच आठ मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत निश्चय करण्यात आला.
यानिमित्ताने आठही मतदारसंघात अनेकांनी उमेदवारी मागितली. तरीही बैठकीतील विषय वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवले जातील. त्याठिकाणी कोणाचीही उमेदवारी जाहीर झालीतरी सर्वांनी संबंधिताच्या पाठिशी ठामपणे आणि एकदिलाने उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे ‘परिवर्तन महाशक्ती’ जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
महिलांकडूनही उमेदवारीची मागणी...
साताऱ्यातील बैठकीत अनेकांनी उमेदवारी देण्याची मागणी केली. यामध्ये काही सेवानिवृत्त शिक्षक, प्राध्यापक होते. तसेच महिलांनीही ‘परिवर्तन महाशक्ती’च्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली. संघटनेने महिलांनाही उमेदवारी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहारचे अधिक उमेदवार रिंगणात राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.