व्हायरस म्हणतो, ‘मी पुन्हा येईन!’; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 06:18 AM2021-03-04T06:18:42+5:302021-03-04T06:19:18+5:30
विधिमंडळात ठाकरेबाणा पाहून विराेधी आमदार चाट, सरकारवर जरूर टीका करा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका, असे आवाहन करतानाच खोटे बोलून लाट येते, सत्ता मिळते, पण ती टिकत नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. बाबरी मशीद पडली तेव्हा येरे गबाळे पळून गेले. आता राममंदिरासाठी पैसे गोळा करता? फिरत आहेत. कोरोना काळात चांगले काम केले असताना महाराष्ट्राची बिहारसोबत तुलना का करता? आमच्यावर जरूर टीका करा; पण, महाराष्ट्राची बदनामी करू नका. खोटं बोलून लाट येते, सत्ता मिळते, पण ती टिकत नाही, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्व, राममंदिर, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा परामर्श घेत ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्र्यांचा आजचा आवेश पाहून विरोधी बाकावरील आमदारही चाट पडले.
काही सदस्यांनी ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला. त्यास सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेताच फडणवीस यांनी उभे राहून दिलगिरी व्यक्त केली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, मराठीला केंद्राच्या दारात तिष्ठत ठेवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारने दोनवेळा केंद्राला पत्र पाठवले. पण केंद्राने निर्णय घेतला नाही. औरंगाबादचे संभाजीनगर न करण्याच्या भाजपच्या आक्षेपावर ते म्हणाले की, नामांतर आम्ही नक्की करू. पण तेथील विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्याचा विषय केंद्रान अडवून ठेवला आहे. हे विषय मराठी माणसांच्या अस्मितेचे आणि सन्मानाचे नाहीत का?
गुजरातमधील स्टेडियमचे नाव बदलण्यावरूनही ठाकरे यांनी टीका केली. छत्रपती शिवाजीराजे नसते तर तुम्ही तरी दिल्लीत बसला असता का, असा थेट सवाल करुन ठाकरे म्हणाले, तुम्ही स्वत: कोणते आदर्श तयार केले? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना आमचे म्हणायचे, पण स्वत: काही करायचे नाही. आयते आदर्श घ्यायचे ही कसली वृत्ती? वल्लभभाई पटेल यांचे नाव पुसून टाकले आणि तेथे कोणाचे नाव दिले, असा सवालही त्यांनी केला; तेव्हा सभागृहातून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख झाला.
तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नव्हते. बाबरी मशिद पाडल्यावर येरे गबाळे पळून गेले. पण बाळासाहेब एकटे ठामपणे उभे राहिले. ३७० कलम रद्द केल्यानंतर किती हिंदू पंडितांना घरे दिली, असा सवाल करताना त्यांनी, ‘ए महाराष्ट्र के लोगो, पोछ लो आँख का पानी, जो झूठ बोले उनकी, खतम करो बेईमानी’ या ओळी ऐकविल्या.
खोटे बोलून लाट येते, सत्ता मिळते, पण ती टिकत नाही, असे सांगताना त्यांनी विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ‘ ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजवून घे, ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजवून घे, या गाजण्याला अर्थ कितीसा, हे जरा समजून घे’, या ओळी विरोधकांना सुनावल्या.
काही प्रमुख विधाने
केंद्रीय आर्थिक पाहणी
अहवालात महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली. नोटाबंदीची स्तुती करणाऱ्यांनीच हा अहवाल तयार केला आहे.
आमच्याकडे कोविडचा हिशोब
काय विचारता? पण, पीएम केअर्सला दिलेल्या निधीचा हिशोब मागितला का? मुख्यमंत्री निधीऐवजी तुम्ही तर पंतप्रधान निधीलाच पैसे दिलेत.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शिवसेना नव्हती, पण तुमची मातृसंस्थाही नव्हती. पंजाबमधील गरीब शेतकरी संत नामदेवांची पूजा करतो, पण तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या वाटेवर खिळे ठोकले.
तुम्ही तर रिकामी थाळी वाजवायला सांगितली होती. आम्ही तर शिवभाेजनाची भरलेली थाळी गरिबांना देत आहोत. आता गरिबांनाच विचारा, की तुम्हाला भरलेली थाळी हवी की रिकामी?
ठरलं ते तुम्ही
निर्लज्जपणे नाकारलं
n२०१४ साली युती तुम्ही तोडली होती. बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तेथे बसून अमित शहा यांनी माझ्याशी बोलताना काही गोष्टी ठरवल्या होत्या. त्या वेळी आम्ही दोघेच होतो.
nफडणवीस यांना बाहेर का होते, मला माहिती नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, त्या मंदिरात जे ठरलं होतं ते तुम्ही बाहेर येऊन निर्लज्जपणे नाकारलं आणि तुम्ही आम्हाला आता वचनांच्या गोष्टी सांगता? निर्लज्ज हा शब्द असंसदीय असला तरी तो मी वापरणार, असेही त्यांनी ठणकावले.
nएल्गार परिषद प्रकरणातील सर्जील उस्मानी उत्तर प्रदेशात लपून बसला आहे. तेथून आम्ही त्याला आणूच, पण उत्तर प्रदेश सरकारलाही त्यासाठी मदत करायला सांगा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
व्हायरस म्हणतो,
‘मी पुन्हा येईन!’
मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हवर फडणवीस यांनी टीका केली होती. त्यावर ठाकरे म्हणाले : मी जनतेशी त्यांच्या भाषेत संवाद साधतो. मला व्हिलन ठरवले तरी चालेल, पण मी माझ्या राज्याशी बांधील आहे. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. संकटाशी खेळ करू नका. आमदार, खासदार मृत्युमुखी पडले. थट्टा कुणाची करता, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची थट्टा करताय, करा, पण सामान्यांच्या जीवाशी खेळू नका. कोरोना पक्ष, माणूस ओळखत नाही. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणतो! त्यांच्या या वाक्यावर जोरदार हंशा पिकला.