शशिकला यांचा राजकारणातून संन्यास, निवडणुकीपूर्वी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 07:47 AM2021-03-04T07:47:38+5:302021-03-04T07:49:06+5:30
Tamilnadu Assembly Election 2021: शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि एआयएडीएमके (AIADMK) च्या नेत्या व्हीके शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शशिकला यांनी तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेतला आहे. तर शशिकला या आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरण यांनी सांगितले होते. (vk sasikala announces to quit politics urges aiadmk to stay united and fight dmk)
शशिकला यांनी याबाबत एक निवेदन जारी केले असून आपल्या समर्थकांना आणि एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि डीएमके पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, "तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार आणि जयललिता यांच्या मार्गावर जाणार आहे. एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे आणि डीएमकेला निवडणुकीत पराभूत करावे."
दरम्यान, तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणूकीत माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव भासणार आहे. तसेच, सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसन यांची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच, आता शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निवडणुकीआधीच मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शशिकला यांची तुरुंगातून सुटका
शशिकला यांना २०१७ साली ६६ कोटींच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. २७ जानेवारी २०२१ रोजी शशिकला या चार वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून आल्या आहेत. त्यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप होता. शशिकला यांच्या जवळचे समजले जाणारे नातेवाईक जे इलावारसी तसंच जयललिता यांचा मानलेला मुलगा व्ही एन सुधाकरण यांनाही या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती.
तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान
तामिळनाडूत 234 जागांसाठी एक टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.