भाजपाविरोधात मतदान करा, नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरसह 600 कलाकारांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 10:17 PM2019-04-05T22:17:03+5:302019-04-05T22:17:28+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन 600 कलाकारांनी केलं आहे.
नवी दिल्लीः येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन 600 कलाकारांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कलाकारांमध्ये नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकरसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. भाजपाविरोधात मतदान करून त्यांना व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून पायउतार करा, असं आवाहन या कलाकारांनी केलं आहे.
कलाकारांनी यासंदर्भात एक पत्रकही जारी केलं आहे. या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, गिरीश कर्नाड, शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ती जैन, अभिषेक मुजूमदार, कोंकणा सेन-शर्मा, रत्ना पाठक-शहा, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे, अुनराग कश्यप, एम. के. रैना आणि उषा गांगुली यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत. खरं तर हे पत्र एक दोन, नव्हे तर 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडियाच्या संकेतस्थळावर हे पत्र अपलोड करण्यात आलं आहे.
तर काही दिवसांपूर्वी देशातल्या 100 हून अधिक फिल्ममेकर्सनी भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. या संदर्भात त्यांनी एक निवेदनदेखील जारी केलं. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आले आहेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास 111 लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
भाजपा सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली, असा आरोप या सर्वांनी केलाय. शिवाय समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशिपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या विरोधाची मुख्य कारणं आहेत. सरकारच्या अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.