तोडफोड ते थपडा अन् झापडा, शिवसेना-भाजपात शाब्दिक राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 07:18 AM2021-08-02T07:18:08+5:302021-08-02T07:20:44+5:30
Shiv Sena Vs BJP: शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील कटुतेला गेल्या दोन दिवसात शाब्दिक राड्याचे स्वरूप आले आहे.
मुंबई/नागपूर : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील कटुतेला गेल्या दोन दिवसात शाब्दिक राड्याचे स्वरूप आले आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर रविवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आम्हाला थप्पड मारण्याची धमकी देऊ नका. अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि आलं तर सोडत नाही, अशी आव्हानाची भाषा वापरली.
थपडा घेत आणि देतच शिवसेनेचा इथवरचा प्रवास झाला आहे. जितक्या थपडा खाल्ल्या त्याच्या दामदुप्पट दिल्या आहेत आणि याच्यापुढेसुद्धा देऊ, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी वरळी येथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात दिला. शिवसेनेच्या रक्तातच लढवय्येपणाचा गुण आहे. इथे भाषणात साधा विषय काढला तर घोषणा आल्या, आवाज घुमला. त्यामुळे थपडा किंवा धमकीची भाषा कोणी करू नये, असे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे दुर्दैवी - दरेकर
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांनी टीका केली असली तरी मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा होणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे यापेक्षा महाराष्ट्रासाठी दुर्दैवी काही नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी सांगितले.
नशामुक्ती कार्यक्रम घेणे गरजेचे - संजय राऊत
महाराष्ट्रात तातडीने नशामुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरवर दिली आहे. आमदार लाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता अशा वक्तव्यावर आमचे शाखाप्रमुखच बोलतील, असेही राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
तुमचे काय-काय फोडू ते पाहाच! - गुलाबराव पाटील
प्रसाद लाड यांनी आम्हाला तारीख कळवावी व सेना भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी. आम्ही त्यांचे काय-काय फोडू शकतो, हे त्यांना लक्षात आणून देऊ, असे थेट आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने आता काहीही करून वातावरण तापवण्याचा हा प्रकार आता भाजपकडून सुरू आहे.
माझ्यासाठी विषय संपला - प्रसाद लाड
बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो. शिवसेना भवनाबद्दल बोलणे हे चुकीचेच झाले. पण, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. कालच मी व्हिडीओद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे आमदार प्रसाद लाड यांनी रविवारी पुन्हा स्पष्ट केले.