मुस्लिमांवर आमचा विश्वास नाही, म्हणून त्यांना तिकीट नाही, भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:32 PM2019-04-02T15:32:28+5:302019-04-02T15:33:02+5:30
लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार सुरू आहे. याच दरम्यान कर्नाटकातील एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानं मुस्लिमांसंदर्भात एक विधान केलं आहे.
कोप्पलः लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार सुरू आहे. याच दरम्यान कर्नाटकातील एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानं मुस्लिमांसंदर्भात एक विधान केलं आहे. कर्नाटक भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी एका रॅलीदरम्यान मुस्लिमांवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे. ईश्वरप्पांनी हे विधान कोप्पलमधअये कुरबा आणि अल्पसंख्याक समुदायाला संबोधित करताना केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसनं तुमचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे.
तसेच तुम्हाला तिकीटसुद्धा दिलं नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा मगच आम्ही तुम्हाला तिकीट आणि इतर गोष्टी देऊ. केएस ईश्वरप्पा हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. कर्नाटकातील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये 2012 ते 2013दरम्यान ते उपमुख्यमंत्री राहिले होते. कर्नाटकातील 14 लोकसभा जागांसाठी 18 एप्रिलला आणि इतर 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 70 वर्षी ईश्वरप्पा हे कुरुबा समुदायाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधानं केली आहेत.
KS Eshwarappa, BJP while addressing members of Kuruba & minority communities in Koppal: Congress uses you only as vote bank, doesn't give you ticket. We won't give Muslims tickets because you don't believe in us. Believe us & we'll give you tickets&other things. #Karnataka (01.4) pic.twitter.com/3YbqCgwk2C
— ANI (@ANI) April 2, 2019
गेल्या वर्षी फेब्रुवारीत ते म्हणाले होते की, काँग्रेसशी जोडले गेलेले मुस्लिम हे हत्यारे आहेत. परंतु आमच्या पक्षाशी जोडले गेलेले मुस्लिम चांगले आहेत. कर्नाटकात 22 RSS आणि भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करणारेही काँग्रेस मुस्लिम आहेत. चांगले मुसलमान हे भाजपासोबत आहेत. 2015मध्ये ईश्वरप्पा यांनी एका महिला पत्रकारालाही आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. महिला पत्रकाराला ईश्वरप्पा म्हणाले होते की, जर कोणी तुमचं अपहरण करणं तुमचा बलात्कार केल्यास त्याला विरोध पक्ष काय करू शकतो. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती.