'करारा जवाब दिला जाईल...', नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 03:36 PM2021-08-26T15:36:49+5:302021-08-26T15:37:19+5:30
Nitesh Rane on Shivsena: एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात अॅक्शन घेताना नियमांचा भंग केला गेला.
सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. काही तासातच त्यांना जामीनही मिळाला, पण या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने तर काही ठिकाणी भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, या प्रकरणानंतर नारायण राणे यांचे सूपुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, नारायण राणे यांच्याविरोधात राज्य सरकारनं षडयंत्र रचलं आहे. एका केंद्रीय मंत्र्यांविरोधात अॅक्शन घेताना नियमांचा भंग केला गेला. या सगळ्यात कुठेही राजशिष्टाचार पाळला नाही. प्रसंगी त्यांना जेवणाच्या ताटावरुन उठवून नेलं, आम्ही या सगळ्याला करारा जवाब दिला जाईल, असा थेट इशाराच नितेश राणेंनी दिला.
ते पुढे म्हणाले की, सध्या फक्त मातोश्रीला खुश करण्याची स्पर्धा लागलेली आहे. आमदारांना मंत्री बनायचंय, मंत्र्यांना आपलं पद शाबूत ठेवायचंय. जशी ऑलम्पिकची स्पर्धा झाली, तशीच फक्त मातोश्रीला खुश करण्याची स्पर्धा सुरू आहे. आमच्यामुळे त्यांची बेरोजगारी कमी होत असेल, त्यांना पद भेटत असतील, तर आमचा त्यांना आशीर्वाद आहे, असा टोलाही राणेंनी लगावला.