"रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं"; बच्चू कडू संतापले
By मोरेश्वर येरम | Published: December 10, 2020 02:12 PM2020-12-10T14:12:07+5:302020-12-10T14:16:51+5:30
शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दावा रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर दानवेंवर चहूबाजूंकडून टीका होत आहे.
मुंबई
भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारावं लागेल, असा संताप प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दावा रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर दानवेंवर चहूबाजूंनी टीका होत आहे. प्रहार संघटनेचं आज औरंगाबादमध्ये शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. तर दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर संताप व्यक्त केला.
"मागच्या वेळीस रावसाहेब दानवे यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता असं वाटतंय की आम्हाला त्यांना घरात घुसून मारावं लागेल", असं बच्चू कडू म्हणाले.
Last time he made such a statement, we had gheraoed his house. Now, the situation is such that we'll have to enter his house & beat him up: Maharashtra Minister Bacchu Kadu on Union Minister Raosaheb Danve's statement 'China, Pak behind farmer's protest'
— ANI (@ANI) December 10, 2020
(09.12) pic.twitter.com/vPRpDQcJZB
संजय राऊत यांनीही फटकारलं
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असेल तर संरक्षण मंत्र्यांनी तातडीने पाकिस्तान आणि चीनवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही याचा गांभीर्याने विचार करायला हवा", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.