...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर

By कुणाल गवाणकर | Published: September 27, 2020 03:26 PM2020-09-27T15:26:06+5:302020-09-27T15:40:25+5:30

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये गुप्त बैठक; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

we will not try to form government dont have numbers says bjp leader raosaheb danve | ...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर

...तर भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत?; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत दानवेंचं स्पष्ट उत्तर

googlenewsNext

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. ही बैठक सामनाच्या मुलाखतीबद्दल चर्चा करण्यासाठी झाल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मात्र तरीही या भेटीमागे नेमकं कोणतं राजकारण दडलंय, याची चर्चा सुरूच आहे.

फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."

राज्यात सुरू असलेल्या या घडामोडींबद्दल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भाष्य केलं. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यास शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादीसोबत, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला. त्यावर आम्हाला सत्ता स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करणार नाही, असं दानवे यांनी म्हटलं.

संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देताच दानवेंनी भाजपकडे असणाऱ्या संख्याबळाकडे लक्ष वेधलं. 'विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या. मात्र सत्ता स्थापनेसाठी त्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे एखादा आमदारांचा मोठा गट आमच्यासोबत येतो का, ते आम्ही पाहिलं. त्यातूनच पहाटेचा शपथविधी झाला. मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. आता महाविकास आघाडीचं सरकार पडल्यास आम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ आमच्याकडे नाही,' असं दानवेंनी सांगितलं.

मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंप

गेल्या वर्षी नेमकं काय घडलं?
गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महिनाभर सत्तासंघर्ष सुरू होता. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना भाजपपासून दूर गेली. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. मात्र या तीन पक्षांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्यासोबत होते. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं काही तासांमध्येच हे सरकार कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

Web Title: we will not try to form government dont have numbers says bjp leader raosaheb danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.