किरीट सोमय्यांना विरोधच, आता भाजपाचे दिल्लीतील नेते निर्णय घेतील- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 02:40 PM2019-03-29T14:40:15+5:302019-03-29T14:42:45+5:30

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

We will oppose Kirit Somaiya, BJP leaders in Delhi will decide: Sanjay Raut | किरीट सोमय्यांना विरोधच, आता भाजपाचे दिल्लीतील नेते निर्णय घेतील- संजय राऊत

किरीट सोमय्यांना विरोधच, आता भाजपाचे दिल्लीतील नेते निर्णय घेतील- संजय राऊत

Next

मुंबई- ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसैनिकांच्या विरोधामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी रखडली आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, भाजपाशी आमचं भांडण नाही, ईशान्य मुंबईत युतीचाच उमेदवार विजयी होईल.

आधीच्या खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्यं शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांवर केली होती, ती योग्य नव्हती. टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कोणत्या भाषेचा वापर करता याचाही विचार करायला हवा होता. कोणत्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधीच ठरवलं पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना  त्यांनी भरपूर त्रास दिला. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केलेले आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपाचे दिल्लीतील नेते घेतील, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी, यासाठी सोमय्या प्रयत्नशील आहेत. मात्र, उद्धव यांनी भेट नाकारून सोमय्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि शिवसेना नेतृत्वावर खालच्या पातळीवर जात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांचा सोमय्यांच्या उमेदवारीवर आक्षेप आहे. ‘एकच स्पीरिट, नो किरीट’ अशी नारेबाजीही शिवसैनिकांनी सुरू केली आहे.
ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर सोमय्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून शिष्टाईसाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. लाड लोकसभेसाठी इच्छुक आहेत, त्यासाठीच ते मातोश्रीवर दाखल झाल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपा नेते मनोज कोटक, प्रवीण छेडा आदी नावांमध्ये आता लाड यांच्या नावाचा समावेश झाल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहेत.

मातोश्री भेटीबाबत लाड म्हणाले की, युतीबाबतच्या काही कामांसाठी मी येथे आलो होतो. सोमय्यांच्या उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील. युतीत कसलाच तणाव अथवा मतभेद नाहीत. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. सोमय्यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेले नाट्य आणखी काही दिवस चालेल असे दिसते आहे. या मतदारसंघाबाबत शेवटच्या टप्प्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. मात्र, राऊत यांचे विधान पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: We will oppose Kirit Somaiya, BJP leaders in Delhi will decide: Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.