महाविकास आघाडीची ऑटो लवकरच पंक्चर करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 12:10 PM2021-08-27T12:10:10+5:302021-08-27T12:10:47+5:30
बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, ही तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केलीजाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेत बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीरपणे अटक केली, हे न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन देऊन सिद्ध केले आहे. शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सेनेला जागा ठेवणार नाही, असे भाजपचे नियोजन आहे. अमरावती शहरात शिवसेनेने धुडघूस घातला असून, गुंड सैनिकांना अटक व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
भाजप-युवा स्वाभिमान एकत्र नाही
भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र निवडणूक लढणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आमदार रवि राणा हे भाजपचे सहयाेगी सदस्य आहेत. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद अथवा नगर परिषद निवडणुका भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र लढणार, ही केवळ चर्चा असल्याचे ते म्हणाले.