"मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 10:00 PM2021-01-24T22:00:09+5:302021-01-24T22:03:50+5:30
pravin darekar : मराठा समाजाचे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
मुंबई : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रति महाविकास आघाडी सरकारला काहीच सोयर सुतक दिसत नाही. आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला वेळ नाही, त्यामुळे आज आम्ही सरकारला हात जोडून हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला विनंती करीत आहोत, जर ही विनंती सरकारने मान्य केली नाही तर आम्हीही हात सोडून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करु. त्यानंतर या विषयी जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची राज्य शासनाच्या विविध आस्थापनात नियुक्ती झाली, पण अद्यापही त्यांना नेमणूक मिळाली नाही. एसईबीसीचे आरक्षण त्यांना लागू करावे ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. मराठा समाजातील अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाचे युवक-युवती आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी सरकारशी संघर्ष करु असेही दरेकर यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. नवीन नोकर भारतीपासून हे सरकार थांबायला तयार नाही. पण आमचा काही कुठल्याही जाती, धर्माच्या विभागाच्या लोकांबाबत बोलायचे नाही. पण सरकार प्रत्येक दिवशी नवीन नोकर भरती जाहीर करत आहे. आरोग्य विभागा, गृह विभाग यांनी नवीन नोकर भरती जाहीर केली. याचा अर्थ तुमच्या मनात पाप आहे. जर या नवीन भरती झाल्या तर एसईबीसीच्या आरक्षणाचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाची मुले सर्व विभागाच्या भरतीतील एसईबीस प्रवर्गातून वंचित राहावी. त्यांनी ईडब्लूएस मध्ये अर्ज करावा पण या प्रवर्गातमध्ये आधीपासून अन्य प्रवर्ग समाविष्ट आहे, त्यामुळे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही हे स्पष्ट असतानाच सरकार केवळ नोकर भरतीचे सोंग आणण्याचे काम करित असल्याचे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, मराठा समाजाच्या विद्यार्थांना कालबद्ध वेळेत निर्णय घेऊन सांगितले नाही. केवळ मलमपट्टी लावायचे काम सरकारने केले. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन शांत झाले, तर त्या मुलांना वाऱ्यावर सोडल जातं. परंतु आता आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मुलांच्या पाठीशी उभे आहोत. मग यासाठी कायदेशीर लढाई असेल वा रस्त्यावरची लढाई असेल कुठलीही लढाई असेल तर त्यामध्ये आम्ही या मुलांच्या पाठीशी उभे राहू असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत पण हे विसरू नका तुम्ही जे आहात ते जनतेमुळे आहात. म्हणून आपल्याला मायबाप बोलतात तुम्ही मराठा समाजाच्या बंधु व भगिनींसाठी योग्य आठवड्यात निर्णय घ्या अशी मागणी करतानाच दरेकर म्हणाले की, जर सुप्रीम कोर्टात काही याबाबत निर्णय झाला व त्यावेळी जी कायदेशीर लढाई द्यायची असेल त्यावेळी ताकदीने लढू. त्यामुळे आता मराठा समजाला खेळवा-खेळवीचे राजकारण थांबवा. गरीब कुटुंबातील मराठी मुलांना मग कोणी एमएमआरडीची भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा अनेक आस्थापनातील अनेक भरती असतील त्यांना मराठा समाजाच्या पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ सामावून घेण्याची विनंतीही विरोधी पक्ष नेते या नात्याने करीत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.